उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या भाषणांमधून अनेकदा त्यांच्या स्वभावाची चुणूक पहायला मिळते. नुकतंच बारामतीमध्ये अजित पवार एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी तर चक्क एक दारुडाच अजित पवारांच्या पाया पडण्यासाठी आला. यावेळी पोलीस आणि इतरांना त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. अगदी दुपारच्या वेळी मद्यप्राशन केलेलं पाहून अजित पवारांनीही आपल्या शैलीत दुपारीच चंद्रावर, काय चाललंय काय? अशी विचारणा केली.

बारामती तालुक्यातील कटफळ येथे ड्रोनद्वारे भूमापन सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी अजित पवारांनी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाची पाहणी करत प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. दरम्यान हे प्रात्यक्षिक सुरु असताना एक दारुडा पाया पडण्यासाठी अजित पवारांसमोर आला. त्यावर अजित पवारांनी होय बाबा, दुपारीच चंद्रावर, काय चाललंय काय? अशी विचारणा केली. नंतर पोलीस त्या दारुड्याला बाजूला घेऊन गेले.

मात्र या घटनेमुळे अजित पवार थोडेसे संतापलेले पहायला मिळाले. त्यांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत. लोक दुपारीच चंद्रावर जायला लागलेत असं सांगत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.