सातत्याने महिलेची छेड काढणाऱ्या मद्यधुंद पोलिसाला नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात घडली. हे प्रकरण वाढू नये, यासाठी सुरुवातीपासून दबावतंत्र वापरणाऱ्या पोलिसांकडून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती.
निगडी पोलीस ठाण्याअंर्तगत बीट मार्शल म्हणून काम करणारा हा पोलीस कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून वाल्हेकरवाडीतील एका महिलेची छेड काढत होता. त्यामुळे ती महिला त्रस्त होती. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंतामणी चौकात रिक्षा स्टँडजवळ त्याने तिला गाठले आणि मोबाइल क्रमांक देण्याची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिला. मद्यधुंद अवस्थेत असलेला हा पोलीस तिच्यावर दादागिरी करू लागला. तेव्हा तिने घरी जाऊन पती व शेजारील नागरिकांना हा प्रकार सांगितला. तेव्हा मोठय़ा संख्येने नागरिक एकत्र आले आणि पोलिसाला बेदम चोप दिला. चिंचवड पोलिसांना ही माहिती मिळाली, तेव्हा पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी संबंधित पोलिसाला ताब्यात घेतले. त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर जमाव एकत्र आला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरू होती. गुन्हा दाखल होत असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते.