राहुल खळदकर

अवेळी झालेल्या पावसाचा फटका फळभाज्यांसह शेतीमालालाही मोठय़ा प्रमाणात बसला आहे. पावसामुळे लाल मिरचीचे नुकसान झाले असून मिरची भिजल्यामुळे प्रतवारीवर परिणाम झाला आहे. मिरची भिजल्याने बाजारात मिरचीचा तुटवडा निर्माण झाला असून घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात किलोमागे ३० रुपयांनी तसेच किरकोळ बाजारात ४० रुपयांनी वाढ झाली.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसेच कर्नाटक या राज्यात मिरचीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. अवेळी झालेल्या पावसामुळे मिरच्यांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात लाल मिरचीचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. पावसामुळे मिरची पिकाचे सर्वाधिक नुकसान कर्नाटकात झाले आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी मिरचीचे नुकसान झाल्याने आगामी काळात मिरचीचा बाजारात मोठय़ा प्रमाणावर तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे मिरचीचे दर तेजीतच राहणार असल्याची माहिती गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड भुसार बाजारातील मिरचीचे प्रमुख व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.

आंध्र प्रदेशातील शीतगृहातील मिरचीचा साठा संपत आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात देशभरात मिरचीचा तुटवडा जाणवणार आहे. परदेशातून मिरचीच्या मागणीत वाढ होत आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात मिरचीच्या किलोच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपये तसेच किरकोळ बाजारात किलोमागे ४० रुपयांनी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मसाल्याचेही दर वाढण्याचा अंदाज

अवेळी झालेल्या पावसामुळे फळभाज्या, पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीचा दर ४० ते ६० रुपयांवर गेला आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे भुसार मालाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मसाला उत्पादक कंपन्यांकडे मिरचीचा पुरेसा साठा नसल्याने येत्या काही दिवसात मसाल्यांचेही दर वाढतील अशी शक्यता मिरचीचे प्रमुख व्यापारी वालचंद संचेती यांनी व्यक्त केली.

मिरचीचे दर किलोमध्ये

* तेजा मिरची- १८५ ते १९५ रुपये

* गुंटुर मिरची (३३४)- १३५ ते १४० रुपये

* गुंटुर मिरची (३४१)- १४० ते १५० रुपये

* ब्याडगी मिरची- १७५ ते २०० रुपये

* गंटुर खुडवा मिरची- ७५ ते ८० रुपये

* ब्याडगी खुडवा मिरची- ६५ ते ७० रुपये