ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या गुन्ह्य़ात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा शिरीष याचाही तेवढाच सहभाग आहे. त्यामुळे त्याने या प्रकरणी शरणागती पत्करावी; अन्यथा त्याचा अटकपूर्व जामीन आम्ही नाकारू, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. न्यायालयाने शिरीष याला यासाठी शुक्रवापर्यंतची मुदत दिली आहे.

या प्रकरणी आपला काहीच सहभाग नाही, असा दावा करत शिरीष यानेही अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर त्याच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी शिरीष याचा दावा मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला. डीएसके आणि हेमंती यांच्याप्रमाणेच शिरीष याचाही या घोटाळ्यात सहभाग असणार आहे. त्यामुळे त्याला दिलासा दिला जाऊ शकत नाही. म्हणूनच त्याने स्वत: शरणागती पत्करावी; अन्यथा आम्ही त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळू, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच शुक्रवापर्यंत याबाबतचा निर्णय घेण्याचे आदेशही दिले.