सुप्रसिद्ध ‘डीएसके’ समुहाचे बांधकाम व्यवसायिक आणि उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला असून, कुलकर्णी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोकमान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांची प्रकृती सध्या ठीक असून, त्यांच्या बरगड्यांना मार मागला आहे. खुद्द डी.एस.कुलकर्णी यांनी आपली प्रकृती ठीक असल्याचे निवेदन जारी केले आहे. निवदेनात कुलकर्णी म्हणतात की, गेल्या २२ वर्षांपासून माझ्यासोबत असणारा माझा सहकारी नीरज याचा काल रात्री झालेल्या अपघातात बळी गेला. याबद्दल मी काही दिवसांनी बोलेनच. पण तूर्तास माझी प्रकृती गंभीर असल्याच्या अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत. यात कोणतेही तथ्य नसून माझ्या बरगड्यांना थोडा मार लागला आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा यांच्या बळावरच या जीवघेण्या अपघातातून मी सुखरूप बचावलो आणि पुढील आठवड्याभरात मी पुन्हा कमास लागेन

मुंबईहून पुण्याकडे जाताना खंडाळा एक्झिटजवळ कुलकर्णी यांच्या कारला कंटेनर आदळला. अपघात इतका भीषण होता की कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला. कुलकर्णी यांना जखमी अवस्थेत लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातात कुलकर्णी यांच्या बरगड्यांना दुखापत झाली. तसेच डोळ्यात काचा देखील गेल्या आहेत. पण सध्यातरी कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.