ठेवीदारांची २ हजारांहून जास्त फसवणूक केल्याप्रकऱणी आरोपी असणारे डीएसके घोटाळ्यातील बिल्डर डी एस कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना अटक करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मकरंद कुलकर्णी देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. नंतर त्यांना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.  डीएसके घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मकरंद कुलकर्णी फरार होते. यानंतर पोलिसांनी मकरंद कुलकर्णी यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती.

पोलीस उपायुक्त (सायबर क्राइम आणि आर्थिक गुन्हे) संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मकरंद कुलकर्णींविरोधात लूकआऊट नोटीस असल्या कारणाने मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. अटक करण्यासाठी आमची टीम तिथे पाठवण्यात आली. डीएसके घोटाळ्याीतल आरोपींपैकी ते एक आहेत”.

२०१७ मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत याप्रकरणी डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, कंपनीतील अधिकारी धनंजय पाचपोर, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. सर्व आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

या प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. कुलकर्णी यांच्या शहरात आणखी काही मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली होती. धायरी भागात त्यांच्या १२ मालमत्ता असल्याचे आढळून आले. पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी भागात त्यांच्या मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या जागांची किंमत बाजारभावानुसार दोनशे ते तीनशे कोटी रूपये असण्याची शक्यता आहे.