पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत गुंतविलेले पैसे परत न मिळाल्याने एका ठेवीदार ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ज्येष्ठ नागरिकाने कौटुंबिक वाद तसेच ठेव परत न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तानाजी गणपत कोरके (वय ६०,रा. भीमनगर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरके यांनी कुलकर्णी यांच्या कंपनीत चार लाख रुपयांची ठेव ठेवली होती. ठेवीची मुदत २०१७ मध्ये संपली होती.  त्यानंतर मुद्दल तसेच व्याजदेखील मिळाले नव्हते. कोरके यांच्या मुलीचा विवाह ठरत नव्हता, त्यामुळे ते नैराश्यात होते. गुरुवारी रात्री घरातील सर्व जण झोपल्यानंतर कोरके यांनी पहाटे पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी मुंढवा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली,तेव्हा कोरके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली.

‘डीएसके यांच्या कंपनीत गुंतवलेली रक्कम परत मिळत नाही. मला चार मुली आहेत. तिघींचा विवाह झाला आहे. लहान मुलीचा विवाह ठरत नाही. पैसे नसल्याने मी तिचा विवाह करु शकत नाही. माझा पत्नीबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. माझ्या आत्महत्येला पत्नीला जबाबदार धरावे तसेच डी. एस. कुलकर्णी यांनी ठेव परत न केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. माझ्यापश्चात मिळणारी आयुर्विमा पॉलिसीची रक्कम तसेच अन्य रक्कम लहान मुलीला देण्यात यावी,’ असे असे कोरके यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

कोरके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे. ते रिक्षाचालक होते. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर कोरके यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे, असे मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी सांगितले. या प्रकरणी तपास सुरू असून तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

कौटुंबिक वाद, नैराश्यातून आत्महत्येचा संशय

मुलीच्या विवाहाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली

तानाजी कोरके यांना चार मुली आहेत. त्यापैकी तिघी विवाहित आहे. धाकटय़ा मुलीचे शिक्षण तसेच विवाहाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. कोरके शिवसेनेच्या कुटुंबातील सदस्य असून त्यांच्या कुटुंबीयांना यापुढील काळात आधार देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.