DSK Fraud Case :प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना मध्यरात्री अचानक त्रास जाणवू लागल्याने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठे यांच्यासह सहा जणांना बुधवारी अटक करण्यात आले होते. न्यायालयासमोर उभा केले असता त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठीत असताना त्यांना मध्यरात्री त्रास जाणवत होता.

डी एस कुलकर्णींना अधिकाराचा गैरवापर करून मोठ्याप्रमाणात कर्ज दिल्याचा आर्थिक गुन्हे शाखेला संशय आहे. त्यामुळे रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार अधिकारी, डीएसकेंचे चार्टड अकाऊंटंट आणि अभियंत्याला पुणे शहर पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलीस कोठडीत आल्यानंतर रवींद्र मराठे यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना त्वरीत ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गुंतवणूकदाराची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी हे मागील तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत.