विमानतळ होणार असल्याने चाकण- खेड परिसरात उद्योगपतींनी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. पुरंदरला विमानतळ लाभदायक होणार नसल्याने पुण्याचे विमानतळ चाकण-खेड परिसरातच व्हावे, यासाठी उद्योगपतींना घेऊन पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांनी मांडली. बडय़ा बिल्डर लॉबीमुळेच शासनाने विमानतळ पुरंदरला हलविला, असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले, की सर्वप्रथम चाकण, बिरदवडी गावामध्ये विमानतळाचे नियोजन होते. मात्र, ही जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा निष्कर्ष २००८ मध्ये आला. त्यानंतर वाकी, िपपरी, भामा नदी लगतच्या जागेची पाहणी झाली. तेथे बागायती जमीन असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे चांदूस, कोये, पाईट, धामणे या गावालगतच्या जागेची चाचपणी झाली. त्यासही विरोध झाला. मुळात या परिसरामध्ये पाहणी केलेली जागा विमानतळ प्राधिकरणाला पसंत पडली नाही. खेड सेझ प्रकल्पाच्या जागेत बीओटी तत्त्वावर विमानतळ उभारण्याची तयारी उद्योगपती बाबा कल्याणी यांनी दाखविली आहे. मात्र, शासनाने दुर्लक्ष केले. ही जागा कल्याणी यांच्या मालकीची असल्याने तेथे विरोध होण्याचा प्रश्न नाही. पण, सरकारने त्यात रस दाखवला नाही.

स्थानिक खासदारांच्या विरोधामुळे चाकण-खेड परिसरातील विमानतळ पुरंदरला गेला, असा अपप्रचार करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांनी प्राधिकरणाने जागा नाकारल्या. चाकण- खेड परिसरात दोन स्वतंत्र िरगरोड, पुणे- नाशिक रेल्वे मार्ग, पुणे- नाशिक रस्त्याचे सहापदरीकरण आदी कामे प्रस्तावित आहेत. याच परिसरात विमानतळ होणार म्हणून उद्योगपतींनी मोठी गुंतवणूक केली. सर्वासाठी पुरंदर विमानतळ लाभदायक होणार नाही. त्यामुळे उद्योग परराज्यात स्थलांतरित होतील. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे आढळराव यांनी सांगितले.