शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये सोमवारी ‘कोव्हॅक्सिन’ची मात्रा द्यायची की ‘कोव्हिशिल्ड’ची यावरून उडालेल्या गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप झाला आणि त्यांना लस न घेताच परतावे लागले. या पार्श्वभूमीवर लशींचा अजिबात तुटवडा नसल्याचे पुणे महापालिके च्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नावनोंदणी करून लस घेण्यासाठी शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये गेलेल्या ज्येष्ठ आणि सहव्याधीग्रस्त नागरिकांना सोमवारी मोठ्या मनस्तापाला तोंड द्यावे लागले. ‘कोव्हॅक्सिन’चा वापर करायचा की ‘कोव्हिशिल्ड’चा याबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम होता. परिणामी लसीकरण के ंद्रावर पोहोचल्यानंतर नागरिकांना ताटकळावे लागले. अखेर के वळ १०० नागरिकांना लस देण्याचा निर्णय खासगी रुग्णालयांनी घेतला आणि उर्वरित नागरिकांना लस न घेताच परतावे लागले.

नव्यांना कोव्हॅक्सिन…

पुणे महापालिके चे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, की दोन्ही लशींचा पुरेसा साठा आरोग्य विभागाकडून महापालिकेला आला आहे, त्यामुळे तुटवड्याचा प्रश्नच नाही. मात्र, नागरिकांना कोव्हॅक्सिन देण्याच्या सूचना आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी यापूर्वी कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा घेतली आहे, त्यांना दुसरी मात्रा देण्यासाठी कोव्हिशिल्डचा पुरेसा साठा शिल्लक ठेवून नव्याने येणाऱ्या नागरिकांना कोव्हॅक्सिन दिले जाणार आहे.

शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी लशींच्या साठ्याचे वितरण अधिक परिणामकारकपणे होण्याची गरज व्यक्त केली. महापालिके च्या आरोग्य विभागाकडे लशींचा साठा पुरेसा असल्याचे समजते, मात्र आमच्यापर्यंत होणारा पुरवठा मर्यादित आहे. शनिवारपर्यंत आम्ही कोव्हिशिल्ड लस देत होतो, सोमवारी आम्हाला नवीन सूचना प्राप्त झाली. त्याप्रमाणे पहिल्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना कोव्हॅक्सिनच द्या, असे स्पष्ट करण्यात आले होते. ज्यांनी पूर्वी कोव्हिशिल्डची मात्रा घेतली आहे आणि ज्यांना कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा द्यायची आहे, त्यांची स्वतंत्र व्यवस्था अचानक करावी लागली. त्यामुळे केंद्रावर आलेल्या के वळ १०० जणांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून लशीचा तुटवडा असल्याचा संदेश नागरिकांमध्ये गेला. लशीचा तुटवडा नसेल तर वितरणव्यवस्था सुरळीत करावी. त्यामुळे रुग्णालये आणि नागरिकांना मनस्ताप होणार नाही, असे या खासगी रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.

काय घडले?

पुणे शहरात शनिवारपर्यंत ‘कोव्हिशिल्ड’ची मात्रा देऊन लसीकरण करण्यात आले. सोमवारी मात्र ‘कोव्हॅक्सिन’ वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिक लसीकरण केंद्रांवर पोहोचल्यावर ‘कोव्हिशिल्ड’ द्यायची की ‘कोव्हॅक्सिन’, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे आढळले. त्यामुळे केंद्रांवर केवळ १०० जणांना लस देण्यात आली. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मन:स्ताप सोसावा लागला. अनेकांना लस घेताच परतावे लागले. लशींच्या तुटवडा नसला तरी वितरण सदोष असल्याची तक्रार खासगी रुग्णालयांनी केली.

गोंधळ कशामुळे?

लसीकरणाला मिळणारा प्रतिसादा वाढत आहे. त्या तुलनेत केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा साठा, त्यात महापालिके ला मिळणारा वाटा आणि त्याचे खासगी रुग्णालयांना होणारे वितरण यात समन्वय नसल्यामुळे गोंधळ झाल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना कोव्हॅक्सिनच द्या, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे ज्यांनी पूर्वी कोव्हिशिल्डची मात्रा घेतली आहे ते आणि ज्यांना कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा द्यायची आहे, अशांची स्वतंत्र व्यवस्था अचानक करावी लागली. या गोंधळामुळे केवळ १०० जणांना लस देण्यात आली. त्यावरून लशींचा तुटवडा असल्याचा संदेश गेला, असे शहरातील एका खासगी रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

राज्यात १५,०५१ नवे रुग्ण

मुंबई  : राज्यात सोमवारी करोनाच्या १५,०५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर शहरात दिवसभरात दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले, तर पुणे जिल्ह््यात २६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात मुंबई १७१३, नागपूर २०९४, पुणे ११२२, पिंपरी-चिंचवड ६९८, उर्वरित पुणे जिल्हा ३६३, ठाणे शहर ३०९, नाशिक ६७१, जळगाव जिल्हा ५००, औरंगाबाद ६५७, अमरावती शहर २२७, वर्धा ३४५ रुग्ण आढळले.

राज्याची नवी नियमावली

करोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने सोमवारी नवे निर्बंध लागू केले. त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. लग्नात ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली असून, अंत्यविधिलाही २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा आहे.

मोदींचा उद्या मुख्यमंत्र्यांशी संवाद  : देशात करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र  मोदी हे बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. लसीकरण मोहीम आणखी वेगाने राबविण्याबरोबरच करोना नियंत्रणासाठी आणखी पावले उचलण्याबाबत दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे होणाऱ्या या बैठकीत चर्चा होईल.