जातीयवादाचे भय दाखवून मुस्लिमांना भावनात्मक साद घालत ६५ वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या मतपेढीच्या राजकारणामुळेच दलित आणि आदिवासींपेक्षाही मुस्लीम समाज मागास राहिला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महंमद हुसेन खान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची घोषणा झाल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गुजरातमधील विकासाचे ध्येय मोदी यांनी साध्य केले असल्याने परिवर्तनाचा ध्यास घेत मुस्लीम मतदार भाजपच्या बाजूनेच मतदान करेल, असा दावाही खान यांनी केला. आमदार गिरीश बापट, महापालिकेतील गटनेते अशोक येनपुरे, नगरसेवक दिलीप काळोखे, महेश लडकत, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रा. अस्मा शेख, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष इसहाक चावीवाले या प्रसंगी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांत काँग्रेस पक्षाने मुस्लिमांच्या विकासासाठी काहीच केले नाही. मुस्लीम समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले. मतपेढी एवढय़ाच भूमिकेतून पाहणाऱ्या काँग्रेसने भावनांशी खेळ करून केवळ मुस्लिमांच्या मतावर राज्य केले. पण, मुस्लीम समाजाला उपेक्षित ठेवले. सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करून खान म्हणाले, भ्रष्टाचार आणि अत्याचार हेच सूत्र असलेल्या काँग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली असून मुस्लीम समाजामध्ये परिवर्तनाची लाट आली आहे. त्यामुळे काँग्रेसने आता मुस्लिमांना नरेंद्र मोदी यांचे भय दाखवू नये.