‘‘देशातील आरोग्य क्षेत्रावर खासगी क्षेत्राचे अधिपत्य आणि शासकीय आरोग्य यंत्रणेवरील अविश्वास यांमुळे रुग्ण खासगी रुग्णालयांकडे वळतात. त्यामुळे देशातील २४ दशलक्ष रूग्ण हे उपचारांचा खर्च करू शकत नाहीत,’’ असे मत रूग्णालय आणि आरोग्य क्षेत्राच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे संचालक डॉ. नरोत्तम पुरी यांनी गुरूवारी व्यक्त केले.
सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘फिल्ड मार्शल माणेकशॉ’ स्मृती व्याख्यानामध्ये डॉ. पुरी बोलत होते. या वेळी सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक निवृत्त ब्रिगेडियर राजीव दिवेकर, सिम्बायोसिसचे आरोग्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे सहसंचालक डॉ. बी. के. लोंढे आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. पुरी म्हणाले, ‘‘देशातील ८० टक्के आरोग्य सुविधा या खासगी क्षेत्राकडून पुरवल्या जातात. देशातील २४ दशलक्ष रूग्ण हे विमाधारक नसल्यामुळे उपचारांचा खर्च करू शकत नाहीत. देशातील शासकीय आरोग्य सुविधा अधिक सक्षम केल्यास ही परिस्थिती बदलू शकेल. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्राच्या गुणवत्तेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी रूग्णालयांच्या मूल्यांकनाची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. रुग्णालये त्यासाठी पुढाकारही घेत आहेत. मात्र, भारतात याबाबत पुरेशी जागरूकता नाही, त्याचप्रमाणे मूल्यांकन करून घेणे हे ऐच्छिक आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत रूग्णालयांचे मूल्यांकन करण्यात भारत अजून मागे आहे.’’