स्पेलिंग लिहिण्यात चूक झाल्यामुळे एका शिक्षिकेने पहिलीतील मुलाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे घडली. या शिक्षिकेविरोधात भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. टीशा पिल्ले असे शिक्षिकेचे नाव असून सुमित रवींद्र चव्हाण (वय ६) असे मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित चव्हाण हा इंद्रायणी नगर येथील स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी स्पेलिंग लिहिण्यात चूक झाल्याने टीशा पिल्ले या शिक्षिकेने सुमितला हातावर, पाठीवर, लाकडी छडीने बेदम मारहाण केली. त्याचबरोबर सुमितच डोकं बाकड्यावर आदळले. यामुळे सुमितच्या डोक्यालाही दुखापत झाली. पाठीवर आणि हातावर व्रण उमटले आहेत. हा सर्व प्रकार सुमितने त्याच्या वडिलांना सांगितला. याप्रकरणी शिक्षिका टीशा पिल्लेच्याविरोधात रवींद्र चव्हाण यांनी भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अद्याप शिक्षिकेला अटक करण्यात आलेली नाही.