बसगाडय़ा बंद पडल्याने कोंडीत भर; पाण्याचा विसर्ग वाढल्याने भिडे पूल बंद संततधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मंगळवारी वाहतूक कोंडी झाली. खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने डेक्कन भागातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे डेक्कन भागात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, शहरातील कर्वे रस्ता, डेक्कन भागातील खंडुजीबाबा चौकासह आठ ठिकाणी पीएमपी बस बंद पडल्याने कोंडीत भर पडली. मध्यरात्रीपासून शहरात संततधार सुरू होती, त्यामुळे वाहतुकीचा वेग संथ झाला होता. खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यानंतर डेक्कन भागातील भिडे पूल पाण्याखाली गेला. त्यानंतर सकाळपासून डेक्कन भागात वाहतूक कोंडी झाली. जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान, डेक्कन भागात कोंडी झाल्यानंतर त्याचा ताण आपटे रस्ता तसेच घोले रस्त्यावर पडला. जंगली महाराज रस्त्यालगत असलेल्या छोटय़ा गल्ल्यांमध्ये कोंडी झाली होती. या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. मात्र, बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, लाल बहादूर शास्त्री रस्ता, डेक्कन, स्वारगेट, शंकरशेठ रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतुकीचा वेग संथ झाल्याने या भागात कोंडी झाली होती. कर्वे रस्ता, पौड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग कमी झाला होता. पाऊस असल्याने अनेक नागरिक मोटार घेऊन रस्त्यावर आले होते. दुचाकींपेक्षा रस्त्यावर मोटारी जास्त प्रमाणात असल्याने वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक झाली. शहराच्या मध्य भागात बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्त्यावर कोंडी झाली होती. कर्वेनगर भागातील राजाराम पूल, कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौक, पौड फाटा, स्वारगेट येथील जेधे चौक, डेक्कन भागातील खंडुजीबाबा चौक, शिवाजीनगर येथील शिवाजी पुतळा चौक, बाजीराव रस्त्यावर दक्षिणमुखी मारुती मंदिरानजीक पीएमपी बस बंद पडल्या. बस बंद पडल्याने या भागात कोंडी झाली होती. शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर सायंकाळी वाहतुकीचा ताण वाढला. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे नियंत्रण केले. मात्र तरीही सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी कायम होती. पावसामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू राहते. काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोंडी होते. शहरातील ज्या भागात कोंडी होती, त्या भागांची पाहणी करण्यात येणार आहे. मंगल कार्यालय, मंडई, फेरीवाले, अपघात क्षेत्र तसेच अन्य चौदा मुद्यांची बारकाईने माहिती घेण्यात येणार आहे. - तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा