करोनामुळे वाढलेली बेरोजगारी यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशमूर्तींचे दर कमी झाले असून, उत्पन्न आणि गणेश मूर्ती विक्रीचे प्रमाण जवळपास ३० टक्के कमी झाले आहे. अशी माहिती गणेश मूर्ती कारखानदारांनी दिली आहे. दरवर्षी शंभर टक्के गणेश मूर्ती विकल्या जायच्या, मात्र यावर्षी घरगुती गणपती बाप्पांना गणेश भक्तांकडून पसंती मिळत असून, निम्मे सार्वजनिक गणेश मंडळ करोना संकटामुळे गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले आहे.

करोना विषाणूचे संकट अवघ्या जगात आहे. याचा अनेक देशांना फटका बसला असून यातून भारत देखील सुटू शकला नाही. करोनामुळे देशात बेरोजगारी वाढल्याचेही चित्र आहे. शिवाय, सणांवर देखील त्याचा परिणाम दिसत आहे. काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर देखील करोनाचा परिणाम झाला असून, यावर्षी ३० टक्के मूर्ती विक्रीत घट झाली आहे व गणेश मुर्तींच्या दरात देखील कपात करण्यात आली आहे. तर घरगुती गणपतीमध्ये शाडू मातीच्या गणेश मुर्तींना भक्तांनी पसंती दिली आहे. सध्या अनेकजण बेरोजगारीशी दोन हात करत असताना, मुर्तीकारांनी मात्र सध्याची परिस्थिती पाहून दर कमी केले आहेत, असं मूर्ती कारखानदार गोरख कुंभार यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा गणेशोत्सव वेगळा असून घरगुती गणपतीना नागरिक प्राधान्य देत आहेत. दर वर्षी सार्वजनिक गणेश मंडळांचे ४० टक्के बुकींग व्हायचे. परंतु, यावर्षी मोठ्या मूर्तींचे बुकींग कमी झाले आहे. दरम्यान, गणेश मुर्तींच्या विक्रीमध्ये ३० टक्के घट झाली असून, यावर्षी गणेशमूर्तींचा व्यवसाय संकटात सापडला आहे. काही गणेश भक्त करोनाच्या संकटामुळे एक दिवस अगोदरच गणेशमूर्ती घेऊन जात आहेत. तशी आम्ही देखील त्यांना कल्पना दिली होती असेही  त्यांनी सांगितले आहे.