दिवाळीत गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने घाऊक तसेच किरकोळ बाजारात गुळाचे दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात गुळाच्या दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो गुळाचे दर तीन ते चार रुपयांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात गुळाचे दर ४५ ते ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

सणासुदीच्या काळात गुळाच्या मागणीत मोठी वाढ होते. नागपंचमीपासून गुळाच्या मागणीत वाढ सुरू होते. गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत गुळाला मागणी असते. नवरात्रोत्सवात झालेल्या मुसळधार पावसामुळे उसशेतीत पाणी साठले होते. सलग पंधरा दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने ऊसतोडणी झाली नाही. त्यामुळे गुऱ्हाळे बंद ठेवण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत गुळाची आवक अपुरी पडत असल्याने गुळाचे दर तेजीत आहेत, अशी माहिती मार्केटयार्डातील गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून गुऱ्हाळे पुन्हा सुरू झाल्याने गुळाची आवकही वाढली आहे. मात्र, गुळाला असलेली मागणी पाहता दर टिकून आहेत, असे बोथरा यांनी नमूद केले.  दौंड तालुक्यातील यवत,राहू, पाटस, केडगाव, बारामती, तसेच क ऱ्हाड, पाटण, सांगली भागात गुऱ्हाळे आहेत. दिवाळीत असलेली मागणी पाहता गुऱ्हाळे दिवस-रात्र सुरू आहेत. मार्केटयार्डातील भुसार बाजारात दररोज ३ ते ४ हजार गूळ खोकी आणि ३ ते ४ हजार ढेपांची आवक होत आहे. मार्केटयार्डातील भुसार बाजारातून नाशिक, ठाणे, मुंबई परिसरात गूळ विक्रीसाठी पाठविला जात आहे. दिवाळीत गृहिणी मोठय़ा प्रमाणावर गुळाचा वापर करतात. दिवाळीनंतर गुळाची मागणी कमी होईल. त्यानंतर दरात घट होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

घाऊक बाजारातील गुळाचे दर (क्विंटलमध्ये)

तीन नंबर- ३१००  ते ३३०० रुपये

दोन नंबर- ३३५० ते ३५००

एक नंबर-३५५० ते ३७००

एक्स्ट्रा (उत्तम प्रतवारीचा गूळ)- ३८०० ते ४०००

गूळ खोके- ३४०० ते ३९००, ४००० ते ४८००