पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या पावसाळी स्थितीमध्ये राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका घटला असला, तरी ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानाचा पारा वाढून रात्रीचा उकाडा वाढला आहे. दरम्यान, राज्यातील पावसाळी वातावरण पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातून गेलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तारांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. राज्यात बहुतांश भागात दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. परिणामी दिवसाच्या किमान तापमानात घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांखाली आला असून, सरासरीच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. देशात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असलेल्या विदर्भातही तापमानात मोठी घट झाली आहे. ४२ ते ४३ अंशांवर असणारा पारा रविवारी ३५ ते ३७ अंशांपर्यंत खाली आला होता. मराठवाड्यातही कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. कोकण विभागात मात्र कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १ ते २ अंशांनी अधिक आहे.

राज्याच्या बहुतांश भागात रात्रीही ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उष्णता वातावरणातच राहत असल्याने रात्रीचा उकाडा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात २० ते २४ अंशांपर्यंत किमान तापमान गेले असून, सरासरीच्या तुलनेत ते २ ते ४ अंशांनी अधिक आहे. कोकण विभागात किमान तापमानाचा पारा २४ ते २७ अंशांवर आहे. मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान २२ ते २४ अंशांपर्यंत गेल्याने रात्रीचा उकाडा वाढला आहे.