मुका व बहिरा असल्याचे ओळखपत्र व मदतीचे प्रमाणपत्र घेऊन तो लोणावळा ते पुणे दरम्यान विविध ठिकाणी मदत मागण्यासाठी फिरत होता.. पण, त्याचा इरादा काही निराळाच होता.. अखेर पोलिसांची नजर त्याच्याकडे वळली.. पोलिसी खाक्या दाखवताच त्याला चांगले ऐकू येऊ लागले.. मुका असलेला तो चक्क धडाधडा बोलूही लागला अन् चोरीचा भलामोठा खजिनाच बाहेर आला. मुका व बहिरा असल्याचे भासवून लोकांच्या घरातून महागडय़ा वस्तू चोरण्याचा उद्योग करणाऱ्या या चोरटय़ाकडून पोलिसांनी ७ लॅपटॉप, ३५ मोबाइल व एक महागडा कॅमेरा जप्त केला आहे.

आर. रमेश ऊर्फ एस. कुमार रामचंद्र (वय २३, रा. देहूरोड, मूळ रा. माझूर, ता. चिमूर, आंध्रप्रदेश) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. रामचंद्र याच्याकडे तो मुका व बहिरा असल्याचे एक ओळखपत्र होते व मदत देण्याबाबतचे प्रमाणपत्रही होते. लोणावळा ते पुणे दरम्यान विविध भागांमध्ये तो खोली घेऊन भाडय़ाने राहात होता. ज्या भागात जाईल तेथील परिसराची तो बारकाईने पाहणी करीत असे. कुणी हटकल्यास मुका असल्याचे ओळखपत्र व मदतीचे प्रमाणपत्र तो दाखवत होता. त्यामुळे त्याचा कुणाला संशय येत नव्हता. एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यास घरातील लोकांची नजर चुकवून तो लॅपटॉप, मोबाइल व इतर किमती वस्तू पळवूत नेत होता.

लॅपटॉप व मोबाइल चोरीच्या गुन्हय़ाबाबत गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कर्मचारी गणेश काळे यांना खबऱ्यामार्फत एक माहिती मिळाली. त्यामुळे रामचंद्र याच्याकडे पोलिसांची नजर वळाली. केवळ संशय म्हणून चिंचवड रेल्वेस्थानकाच्या परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडील बॅगेत दोन लॅपटॉप व तीन मोबाइल संच सापडले. त्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरला. त्यातून त्याच्याकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, मुका व बहिरा असल्याचेच तो भासवत होता. त्याचा अभिनय इतका बेमालूम, की एका क्षणाला पोलिसांनाही तो मुका व बहिरा असल्याबद्दल खरे वाटू लागले. मात्र, पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवण्याचा निर्णय घेतला व कसून चौकशी केली. त्यानंतर हा चोरटा धडाधडा बोलू लागला.

रामचंद्रकडून पोलिसांनी आतापर्यंत ७ लॅपटॉप, ३५ मोबाइल संच व एक कॅमेरा, असा सहा लाख १४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्याकडून एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले असून, आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोऱ्हाडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.