नामसाधम्र्यामुळे अनेकदा घोळ होतात. मोहन जोशी असे म्हटल्यावर अभिनेते की काँग्रसचे नेते असा संभ्रम पडतो. पण, चेहरेपट्टीमध्ये साम्य असेल तरी हा घोळ होण्याची शक्यता असते. सध्या असलेल्या मोदी लाटेच्या प्रभावामध्ये हुबेहूब नरेंद्र मोदी आपल्याला दिसले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. चेहऱ्यामध्ये असलेल्या साम्यामुळे राजेंद्र देशपांडे हे आता नरेंद्र मोदी यांच्या ‘गेटअप’मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
व्यवसायाने जाहिरातींचे कॉपीरायटर, मेकअप आर्टिस्ट असलेल्या राजेंद्र देशपांडे यांना मित्रमंडळीमध्ये राजेंद्र मोदी असेच संबोधिले जाते. किलरेस्कर वसुंधरा फाउंडेशनच्या सुंदर शाळा उपक्रमात विनिता पिंपळखरे दिग्दर्शित ‘अब की बार स्वच्छ सरकार’ या नाटकामध्ये देशपांडे यांनी नरेंद्र मोदी यांची भूमिका केली होती. त्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून माझ्यासमवेत छायाचित्रे काढून घेतल्याचे देशपांडे यांनी सांगितले. मोदी कुर्ता, नैसर्गिकरीत्या पांढरे झालेले केस, जॅकेट, घडय़ाळ, चष्मा अशा नरेंद्र मोदी यांच्या पेहरावात मी सभा आणि रॅलीमध्ये सहभागी होत भाजप उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. मात्र, मी भाजपचा कार्यकर्ता नसल्यामुळे कोणत्याही सभेमध्ये भाषण करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.