तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने अजरामर झालेला सिंहगड तीनशे वर्षांपूर्वीचा पुन्हा जिवंत होणार आहे. गडावर चहुबाजूला शस्त्रधारी मावळ्यांचा वावर, तलवार, दांडपट्टा, लाठीबोथाटी अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, वीररस जागवणाऱ्या पोवाडय़ांचे सूर अशा वातावरणात शिवकाळ जसाच्या तसा पर्यटकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न होणार आहे..
निमित्त आहे दुर्गदिनाचे! इतिहास प्रेमी मंडळातर्फे १ जून रोजी सिंहगडावर ‘सिंहगड जागरण’ या नावाने दिवसभर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ तारखेला सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळात होणारा हा कार्यक्रम पर्यटकांसाठी विनामूल्य खुला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक मुक्ता टिळक या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाविषयी माहिती दिली.
तानाजी मालुसरे यांच्या समाधीवर सकाळी ८ वाजता ध्वजारोहण केले जाणार आहे. गटाच्या पुणे दरवाज्यापासून १० वाजता ढोलताशांच्या गजरात शिवरायांची मिरवणूक काढली जाईल. दुपारी चार वाजता छत्रपती श्री. राजाराम महाराजांच्या समाधीचे पूजन केले जाईल. सिंहगडाचा परिपूर्ण इतिहास सांगणारे गाईडही या दिवशी उपस्थित राहून पर्यटकांना माहिती देणार आहेत.
१ जून हा दिवस साहित्यिक गो. नि. दांडेकर यांचा स्मृतिदिन आहे. गोनिदांनी प्रचंड दुर्गभ्रमंतीतून केलेले लिखाण आणि त्याद्वारे तरूणांमध्ये गडकिल्ल्यांविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण ठेवण्यासाठी हा दिवस दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो.

पुणे दरवाज्यातच होणार खास स्वागत
पर्यटकांना तीनशे वर्षांपूर्वीच्या काळाचा अनुभव देण्याचा प्रयत्न गडाच्या प्रवेशद्वारापासूनच केला जाणार आहे. पुणे दरवाज्यातच पर्यटकांचे खास स्वागत करण्यात येईल. तोरणे, फुलांच्या माळा, मंगल कलश, रांगोळी अशा सजावटीने या दिवशी पुणे दरवाजा आणखी खुलून दिसेल. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे स्वागत अत्तर लावून केले जाईल. गडात प्रवेश करताना सनई-चौघडय़ांचे मंगल स्वरही कानावर पडतील.

पुन्हा एकदा शिवकालीन व्यवसायांची झलक

शिवकाळात प्रचलित असणाऱ्या व्यवसायांपैकी कुंभार, लोहार, बुरूड, कासार, पाथरवट या मंडळींना प्रत्यक्ष काम करताना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. दवंडीवाला, तोफेला बत्ती देणारा ‘तोफची’ यांनाही जवळून पाहता येईल. मंडळाचे शेकडो कार्यकर्ते या दिवशी दिवसभर मावळ्यांच्या वेशात गडावर फिरून गस्त घालणार आहेत. अमृतेश्वराच्या मंदिरात नारदीय कीर्तन, वारकरी भजन आणि रामदासी श्लोक पठण ऐकता येणार आहे. वेदमंत्रांची संथा घेणाऱ्या बटूंचेही दर्शन घडेल.
.
मर्दानी खेळांपासून पोवाडय़ांपर्यंत
तलवारबाजी आणि भालाफेकीसारख्या लोकप्रिय मर्दानी खेळांबरोबरच दांडपट्टा, लाठीबोथाटी, वैत्रचर्म हे शिवकालीन मर्दानी खेळ कसे खेळले जात याची प्रशिक्षित कलाकारांनी केलेली प्रात्यक्षिके या दिवशी बघता येतील. मलखांब, कुस्ती, आटय़ापाटय़ा, विटीदांडू हे खेळही खेळून दाखवले जातील. शिवचरित्र उलगडणाऱ्या दमदार पोवाडय़ांचे गायनही याबरोबर सुरू असेल. महिला विभागात मंगळागौर, भोंडला, जात्यावरच्या ओव्या, पाळणा असे पारंपरिक सांस्कृतिक प्रकार पाहायला मिळणार आहेत.
.
तुम्हीच व्हा शिवरायांचे मावळे
या दिवशी सिंहगडावर अश्वारोहण करण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच, मावळ्यांच्या पारंपरिक वेशात छायाचित्र काढून घेण्याची सोयही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचेही या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ९४२०४८३१८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.