गौरी, गणपतीचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गृहिणींनी घरातील जिन्नसांची मोठय़ा प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत गुळाच्या मागणीतही वाढ झाली असून परिणामी घाऊक बाजारात गुळाच्या दरात प्रतिक्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळीच्या दरातही वाढ झाली असून गौरी, गणपती, दसरा आणि दिवाळीपर्यंत गुळाचे दर तेजीतच राहणार आहेत.

गुळाच्या मागणीत वाढ सुरू झाल्यामुळे पुढील दोन महिने गुळाचे दर तेजीत राहणार आहेत. सध्या मार्केट यार्डातील भुसार बाजारात गुळाची आवक वाढली आहे. दौंड तालुक्यातील राहू पिंपळगाव, केडगाव, पाटस तसेच दौंडलगत गुऱ्हाळे आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर ही गुऱ्हाळे सुरू झाली आहेत. तसेच मागणीत वाढ झाल्याने या भागातून होणारी गुळाची आवकही वाढली आहे, अशी माहिती भुसार बाजारातील व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

गौरी, गणपती, दसरा, दिवाळीत गुळाच्या मागणीत वाढ होते. त्याप्रमाणे किरकोळ विक्रेत्यांकडून गुळाची मागणी वाढली आहे. गुळाचे दर प्रतिक्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढले आहेत. पुढील दोन महिने गुळाचे दर तेजीत राहतील. गेल्या काही दिवसांपासून सामान्य ग्राहकांकडून खोक्यातील गुळाला  मागणी वाढली आहे. सामान्य ग्राहक छोटय़ा खोक्यांमधील गूळ विकत घेतात. गणपतीसाठी गुळाच्या मोदकाला चांगली मागणी असते. गुळाच्या मोदकाच्या प्रतिक्विंटलचे दर सात ते साडेसात हजार रुपये आहेत, अशीही माहिती बोथरा यांनी दिली.

रसायनरहित गुळाच्या मागणीत वाढ

गेल्या काही वर्षांत ग्राहकांकडून रसायनविरहित गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या गुळाच्या निर्मितीसाठी रसायनांचा वापर केला जात नाही. रसायनविरहित गुळाचे घाऊक बाजारात प्रतिक्विंटलचे दर ३७०० ते ४५०० रुपये आहेत, असे गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार गुळाचे क्विंटलचे दर २९५० ते ३७०० रुपये असे आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर ४० ते ५० रुपये आहे.