तुरुगांतील चांगल्या वर्तणुकीमुळे अभिनेता संजय दत्तला त्याच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच सोडण्यात आले असले, तरी शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठविण्यात आल्यानंतर संजय दत्तला तेथील नियम पाळण्यासाठी खडसावण्यात आले होते, अशी आठवण कारागृह विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितली. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तच्या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब केल्यावर त्याला सुरुवातीला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे कैद्यांचा गणवेश घालण्यास त्याने सुरुवातीला नकार दिला होता. पण कारागृहातील अधिकाऱ्यांकडून त्याला खडसावण्यात आल्यानंतर त्याने कैद्यांचा गणवेश घालण्यास सुरुवात केली, असे स्वाती साठे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, अभिनेता असला तरी संजय दत्तला तुरुंगात कोणतीही वेगळी वागणूक दिली गेली नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला पहाटे साडेपाच वाजता उठायला लागत होते. त्यानंतर प्रार्थना, व्यायाम, चहा, नाश्ता झाल्यावर त्याला सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या खोलीमध्ये दैनंदिन काम दिले जायचे. संजय दत्त खोलीतच बसून कागदी पिशव्या तयार करण्याचे काम करायचा. येरवडा कारागृहात चालविण्यात येणाऱ्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून तो रेडिओ जॉकी बनून इतर कैद्यांचे मनोरंजनही करायचा. तो स्वतःच या शोसाठी पटकथा लिहायचा आणि त्याचे निवेदनही करायचा.
संजय दत्तला न्यायालयाने सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेसाठी त्याने एकूण ४२ महिने येरवडा तुरुंगात घालवले. त्याला या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याने १८ महिन्यांचा तुरुंगवास अगोदरच भोगला होता. शिक्षेचा अंतिम कालावधी पूर्ण होण्याच्या १०३ दिवस अगोदरच त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. चांगली वर्तणूक आणि कारागृहातील नियमांच्या आधारेच ही सुटका करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.