राज्य शासनातर्फे सात-बाराचे उतारे ऑनलाईन देण्याची सुरुवात शनिवारपासून (३१ जानेवारी) सुरू होणार असून, त्याचा जाहीर कार्यक्रम भोर येथे होणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
‘एबीपी माझा’च्या शेती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर होते. ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर आणि कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय ‘इक्रिसॅट’चे डॉ. सुभाष वाणी, नेरळ येथील ‘सगुणा बाग’चे शेखर भडसावळे, नाशिक येथील प्रक्रिया उद्योगातील उद्योजक मनीषा धात्रक, जळगाव येथील शेतकरी विश्वासराव पाटील, पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील अल्पभूधारक दुग्धोत्पादक शिवाजी गावडे, सप्तखंजरीवादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोळीकर, बीड जिल्ह्य़ातील लोळदगाव येथील शिवराम घोडके, अकोला येथील नासरी चव्हाण यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचा मुद्रित माध्यम प्रायोजक होता.
खडसे म्हणाले की, ऑनलाईन उतारे देण्याच्या कार्यक्रमाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे जमीनमालक कोठेही असला तरी, आहे त्या ठिकाणी हे उतारे मिळू शकतील. या वेळी जावडेकर यांनी शरद जोशी यांच्यासह सन्मानप्राप्त व्यक्तींचा गौरव केला. खांडेकर यांनी या पुरस्कारांचा उद्देश सांगितला. अशा खऱ्याखुऱ्या ‘हिरों’चा सन्मान करताना एबीपी माझा वाहिनीला अभिमान वाटतो. अशांचे कौतुल करण्याचे काम भविष्यातही सुरूच राहील, असे खांडेकर म्हणाले.
पुरस्कार वितरण कार्यक्रम एबीपी माझा वाहिनीवर ८ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे.