नागरिकांना विविध सेवा-सुविधा ऑनलाईन देण्यासाठी महापालिकेतर्फे ई गव्हर्नन्स प्रकल्प राबवला जात असून या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या विविध विभागांचे संगणकीकरण केले जात आहे. या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन महापौर चंचला कोद्रे आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत नागरिकांना ऑनलाईन सेवा-सुविधा देणे हा प्रशासकीय सुधारणेचा भाग मानण्यात आला असून ही प्रशासकीय सुधारणा अनिवार्य आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे ई गव्हर्नन्स प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिमानता तसेच सुसूत्रता येईल आणि कामकाजाची व्यापकता नियंत्रित करणे प्रशासनाला सुलभ होईल. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. महापौर चंचला कोद्रे, खासदार वंदना चव्हाण, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, माधुरी सहस्रबुद्धे, शिक्षण मंडळ सदस्य रवी चौधरी यांची यावेळी उपस्थिती होती.
ई गव्हर्नन्स प्रकल्पात महापालिकेच्या विविध विभागांकरता बावीस ऑनलाईन संगणकप्रणाली उपलब्ध होणार आहेत. तसेच जुन्या संगणकप्रणाली टप्प्याटप्प्याने बंद केल्या जाणार आहेत. महापालिका सेवक वेतन, विधी सल्लागार कार्यालय, विवाह नोंदणी, नागरवस्ती विकास योजना, भांडार विभाग, सेवकवर्ग विभाग आदी सेवा व विभागांमध्ये ऑनलाईन संगणकप्रणाली कार्यान्वित आहे. तसेच कर भरणा, नागरी सेवा-सुविधा या सेवांसह नगरसचिव कार्यालयाचे कामकाज संगणकप्रणालीने विकसित करण्याचे काम सुरू आहे.
संगणकप्रणालीमुळे महापालिकेकडे माहितीचा एकत्रित गोषवारा तयार झाला आहे. ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत विकसित केल्या जात असलेल्या संगणकप्रणालीमुळे कामकाजात गतिमानता येणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना अधिकाधिक सेवा-सुविधा ऑनलाईन मिळणार आहेत.