सकाळी पाच ते संध्याकाळी पाच.. अशी तब्बल बारा तासांची डय़ूटी.. बदललेल्या जीवनशैलीत अगदी पहिलीचे विद्यार्थीही सध्या अशी बारा तासांची डय़ूटी करत आहेत. आठवडय़ाचे दोन दिवस सुट्टी घेता यावी म्हणून शाळांच्या वाढवलेल्या वेळा, इतर उपक्रम, टय़ूशन्स यामध्ये अगदी पहिलीच्या मुलाचा दिवसही आता सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होऊ लागला आहे.
सकाळी सात वाजता शाळा. त्यामुळे पहिल्या थांब्यावरील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी सकाळी चक्क पाच वाजता बस येते. दुपारी साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत शाळा. त्यानंतर शाळेतच इतर उपक्रमांसाठीचा तास. मग टय़ूशन. असाच काहीसा दिनक्रम अगदी पहिलीच्या मुलांचा म्हणजे सहा वर्षांच्या मुलांचा आहे. गेल्या वर्षी तणावामुळे विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या काही घटना घडल्यानंतरही या परिस्थितीत अद्याप काही बदल झालेला नाही.
मोठे आवार हवे, अधिक सुविधा देता याव्यात यासाठी बहुतेक मोठय़ा संस्थांच्या शाळा या शहराबाहेर आहेत. शाळेने वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली, तरीही वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांची वाहतूक पहाटेच सुरू होते. बहुतेक शाळांमध्ये पाच दिवसांचा आठवडा असल्यामुळे अध्यापनाचे तास पूर्ण करण्यासाठी शाळांनी वेळा वाढवल्या आहेत. त्यातच नियमित विषयांबरोबरच वाढलेले विषय आणि इतर उपक्रमांसाठी अधिकचे तास शाळा घेत आहेत. शाळा दोन सत्रांमध्ये असल्यामुळे सकाळचे सत्र लवकर सुरू करण्याशिवाय शाळांनाही पर्याय नसल्याचे काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
 
शाळा लवकर सुरू होणे ही पालकांची गरज’
सकाळी आपण ऑफिसला जाण्यापूर्वी आपले मूल घराबाहेर पडणे ही आता पालकांचीही गरज झाली आहे. त्यामुळे पालकांकडूनही सकाळच्या सत्राला प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे शाळेच्या वेळा संपल्यानंतर मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी शाळेतच विद्यार्थ्यांसाठी इतर उपक्रमांचे वर्ग अथवा शिकवण्या घेण्याची विनंती पालकांकडून केली असल्याचे निरीक्षण मुख्याध्यापकांनी नोंदवले आहे. अनेक वेळा पालकसभांमध्येही पालक आवर्जून हा मुद्दा मांडत असल्याचेही काही मुख्याध्यापकांनी सांगितले. मुलांवर या परिस्थितीचा ताण येऊ शकतो. मात्र, तो येऊ नये म्हणून आम्ही अधिकाधिक प्रयत्न करतो, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
 
पालक काय म्हणतात?
‘माझ्या मुलाला नेण्यासाठी सकाळी सहा वाजता बस येते. अगदी सकाळी उठून शाळेत जाण्याचा मुलांना त्रास होतो. पण बहुतेक सगळ्या शाळांच्या वेळा अशाच आहेत. एकच बस दोन किंवा तीन भागांमध्ये फिरते. त्या ऐवजी शाळांनी छोटय़ा गाडय़ा ठेवल्या, तर मुलांचा थोडासा वेळ कमी होऊ शकतो.’
– सीमा भोसले
.
‘मुलांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत जसा अनेक शाळांनी तोडगा काढला आहे, त्याप्रमाणेच वेळेबाबतही काही करण्याची गरज आहे. सकाळी लवकर शाळेची बस येते. त्याचा मुलांवर ताण येतो.’
– सई जोशी
 
समुपदेशकांचे म्हणणे..
‘मुलांचे आरोग्य हा त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. किमान पाचवीपर्यंतच्या मुलांच्या शाळांच्या वेळा या त्यांना पुरेशी विश्रांती मिळेल अशा असाव्यात. येणाऱ्या ताणाचा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतोच, त्याचप्रमाणे वागणुकीसंदर्भातील तक्रारीही उद्भवतात. या गोष्टीकडे पालकांनी अधिक सजगपणे पाहणे गरजेचे आहे. मुलांना दिवसभर गुंतवून ठेवण्यापेक्षा त्यांना सकस वेळ देणे जास्त समर्पक आहे. बदलत्या जीवनशैलीप्रमाणे बाकी गोष्टी बदलल्या, त्या प्रमाणे आता मुलांसाठी काही बदल पालकांनी आपल्या जीवनशैलीत केले पाहिजेत.’
– नीलिमा किराणे, समुपदेशक