चार एप्रिलला (शनिवारी) खग्रास चंद्रग्रहण होत असून चंद्रोदयाच्या वेळी म्हणजे चंद्र उगवतानाच कदाचित पृथ्वीची उपछाया त्यावर पडण्याचा सावल्यांचा खेळ पूर्ण झालेला असेल. त्यामुळे शनिवारी चंद्रग्रहण होणार असले तरी ते पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातून पाहायलसा मिळेलच, असे खात्रीने सांगता येत नाही.
मुंबईतील नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी ही माहिती दिली. हे ग्रहण खग्रास स्वरूपात पश्चिम-उत्तर अमेरिका, पॅसिफिक परिसर, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधून खग्रास स्वरूपात अतिशय स्पष्टपणे दिसणार आहे. भारतात चंद्रोदयच उपछायेत होईल. पूर्व भारतात मात्र चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता जास्त आहे, कारण तेथे सूर्य लवकर मावळतो. आसाममधील गुवाहाटी येथे चंद्र क्षितिजावर २० अंशावर असेल, मुंबई येथे चंद्र पश्चिम क्षितिजावर ४ अंशावर असेल. चंद्रग्रहण संपेल तेव्हा तो क्षितिजावर २१ अंशांवर असेल. पुणे व मुंबईतून चंद्रग्रहण उपछायेच्या रूपात दिसेल पण त्यासाठी ती उपछाया ओळखता आली पाहिजे व साधारण नागरिकांना तसे प्रशिक्षण असतेच असे नाही, असे परांजपे यांनी सांगितले. चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक परिणाम असून त्याचा कुठलाही विपरीत परिणाम पृथ्वीवर होत नाही असे परांजपे यांनी सांगितले.
पराजंपे यांनी सांगितले की, खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती भारतातून दिसणे अवघड आहे. कारण भारतात ती स्थिती सायंकाळी ५.२४ वाजता असेल व त्यावेळी चंद्र उगवलेला नसतो. ५.३५ वाजता ही खग्रास अवस्था संपलेली असेल, ती बारा मिनिटांची असेल त्यावेळीही चंद्र क्षितिजाखालीच असेल.
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या छायेत येतो तेव्हा चंद्रग्रहण होते. या दिवशी पृथ्वी ही चंद्र व सूर्य यांच्यामध्ये असते, त्यामुळे चंद्रापर्यंत पोहोचणारे सूर्यकिरण रोखले जातात व पृथ्वीची छाया चंद्रावर असते. चंद्रग्रहण हे पूर्ण चंद्राच्या रात्रीच होते. जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा सूर्य, पृथ्वी व चंद्र सरळ रेषेत असतात. पृथ्वीच्या छायेचे छाया व उपछाया असे दोन भाग असतात. त्यांचे अस्तित्व आपल्याला ५० पैशांचे नाणे वापरून बघता येते. या सावलीचा मधला भाग काळा असतो व कडेचा भाग हा कमी काळा असतो.
भारतीय प्रमाणवेळेनुसार चंद्राला दुपारी २ वाजून २९ मिनिटे व २४ सेकंदांनी पृथ्वीची उपछाया स्पर्श करील, त्याला स्पर्शकाल म्हणतात. नंतर चंद्र या छायेत प्रवेश करील, त्या वेळी दुपारचे ३ वाजून ४५ मिनिटे व १० सेकंद झालेले असतील. ५ वाजून २३ मिनिटे व ५४ सेकंदांनी खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती असेल. पूर्ण खग्रास चंद्रग्रहण सायंकाळी साडेपाच वाजता असेल. सायंकाळी ५ वाजून ३६ मिनिटे ७ सेकंदांनी खग्रास स्थिती संपेल. ५ वाजून १४ मिनिटे व ५२ सेकंदांनी चंद्र पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल व रात्री ८ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंदांनी उपछायेतून बाहेर येईल. उपछायेची स्थिती ६ तास १ मिनिट व ८ सेकंद राहील, तर छायेची स्थिती  ३ तास २९ मिनिटे ४१ सेकंद असेल, तर खग्रास स्थिती १२ मिनिटे १३ सेकंद असेल.
अलीकडे झालेली चंद्रग्रहणे
१५ एप्रिल २०१४
८ ऑक्टोबर २०१४
४ एप्रिल २०१५
२८ सप्टेंबर २०१५ (आगामी)
वर्षांत किती ग्रहणे होतात?
वर्षांतून सात ग्रहणे होतात; त्यात ४ सूर्यग्रहणे, तर ३ चंद्रग्रहणे किंवा ५ सूर्यग्रहणे व २ चंद्रग्रहणे यांचा समावेश असतो. असतात. एका वर्षांत किमान २ ग्रहणे होतात पण ती सूर्यग्रहणेच असतात.