पिंपरी-चिंचवड : हिंजवडी आयटी पार्क नजीकच्या गृहप्रकल्पातील फ्लॅटधारक संगणक अभियंत्यांना घरे खाली करण्याची नोटिस अंमलबजावणी संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून धाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धनशीलन दामोधरण नायर यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सय्यद मुहम्मद मसुद याच्यावर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हिंजवडीमध्ये संगणक अभियंते म्हणून काम करणाऱ्या ७५ जणांच्या ग्रुपने मिळवून हिंजवडीमधील फेज-१ येथे सय्यद मुहम्मद मसूद याच्याकडून २०१४ साली जमीन विकत घेतली आणि त्यावर उत्कर्ष को. हौ. सोसायटी हा गृहप्रकल्प उभारला. हा गृहप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २०१५मध्ये फ्लॅटधारक येथे राहण्यासाठी आले. यात एकूण ८५ कुटुंबे असून १४० फ्लॅट आहेत. त्यातील १११ फ्लॅट धारकांनी ताबा घेतला. मात्र, ज्यांच्याकडून ही जमीन घेतली तो सय्यद मुहम्मद मसूद हा आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे ही जमीन सय्यद मुहम्मद मसूद याच्या मालकीची असल्याने ईडीने या जमिनीवर उभारण्यात आलेल्या फ्लॅट धारकांवर कारवाईला सुरुवात केली आहे.

त्यातील १४ जणांना अचानक १३ जानेवारी रोजी ईडीने नोटीसा बजवल्या आहेत. येणाऱ्या दहा दिवसांत फ्लॅट सोडून जा अशा प्रकारची नोटीस दिली आहे. त्यामुळे येथील फ्लॅट धारकांची झोप उडाली आहे. तर विक्री न झालेले १० फ्लॅट सील करण्यात आले आहेत.

या प्रकारामुळे येथील संगणक अभियंत्यांना मानसिक धक्का बसला असून जमिनीचा व्यवहार करताना सर्व कागदपत्रांची तपासणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, घर सोडण्याची वेळ येथील संगणक अभियंत्यावर आली आहे. त्यामुळे धनशीलन दामोधरण नायर यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सय्यद मुहम्मद मसुद याच्यावर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.