रात डब्यामागे  ४०० ते ५०० रुपयांची वाढ

पुणे : खाद्यतेलांना असलेली चांगली मागणी आणि खाद्यतेलांच्या उत्पादनात झालेली घट यामुळे खाद्यतेलांच्या दरातील वाढ कायम राहिली आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांत खाद्यतेलांच्या दरात पंधरा किलो डब्यामागे ४०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली असून सध्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडत असल्यामुळे खाद्यतेलांचे दर तेजीत आहेत.

एप्रिल महिन्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागला. टाळेबंदी लागू झाल्याने खाद्यतेलांच्या उत्पादनावर परिमाण झाला. कामगारांचा तुटवडाही जाणवू लागला. टाळेबंदीतही खाद्यतेलाला मागणी होती. यंदाच्या वर्षी जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर पावसाने ओढ दिली. पुढच्या टप्प्यात मुसळधार पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस, शेंगदाणा या पिकांचे नुकसान झाले. ब्राझील, अमेरिकेत पोषक हवामान नसल्याने तेथील उत्पादनात घट झाली. इंडोनेशिया, मलेशियामध्ये कमी पाऊस झाल्याने पाम तेलाचे उत्पादन घटले. त्यामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांत खाद्यतेलाच्या पंधरा किलोच्या डब्यामागे टप्प्याटप्प्याने ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली, अशी माहिती खाद्यतेलाचे व्यापारी कन्हैयालाल गुजराती यांनी दिली.

दिवाळीत सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन, पाम तेलाच्या मागणीत वाढ होते.  मागणीच्या तुलनेत आवक कमी पडत आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या दरातील तेजी कायम आहे. दिवाळीपर्यंत खाद्यतेलाचे दर तेजीत राहतील, असे मार्केट यार्डातील खाद्यतेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.