पुणे महापालिका शिक्षण मंडळातर्फे मराठी माध्यमाच्या १९९ शाळा चालवल्या जात असून अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या  अपुरी, तर काही शाळांमध्ये पटसंख्येपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिक्षण मंडळाच्या ५१ शाळांना मुख्याध्यापकच नसल्याची वस्तुस्थितीही समोर आली आहे.
महापालिका शाळांच्या सद्यस्थितीबाबत विविध प्रकारची टीका सातत्याने होते आणि शिक्षकांना अध्यापनाबरोबरच अनेक शाळाबाह्य़ कामे करावी लागत असल्यामुळे वर्गावर शिक्षकच अनुपस्थित असतात ही बाबही मांडली जाते. काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असून एकाच शिक्षकांना वेगवेगळे वर्ग घ्यावे लागतात. या पाश्र्वभूमीवर शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संख्येची माहिती समोर आली असून प्रत्येक शाळेला किमान मुख्याध्यापक नियुक्त करण्याची प्रक्रिया शिक्षण मंडळाने करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या मुख्य सभेसाठी नगरसेवकांना लेखी स्वरूपातील प्रश्न देता येतात. नगरसेवकांच्या या प्रश्नांना प्रशासनाकडून उत्तरे दिली जातात आणि नंतर प्रत्यक्ष सभेत या प्रश्नांवर व उत्तरांवर चर्चा होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही सभेत प्रश्न विचारले जातात व आवश्यक त्या विषयांवर खुलासा मागवला जातो. नगरसेविका विजया वाडकर यांनी शिक्षण मंडळाबाबत चालू महिन्याच्या मुख्य सभेकडे प्रश्न दिले होते. त्यांची उत्तरे शिक्षण मंडळाकडून देण्यात आली असून काही प्रश्नांची उत्तरे मंडळाने दिलेली नाहीत. वाडकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना जी उत्तरे देण्यात आली आहेत त्यानुसार मराठी माध्यमाच्या १९९ मराठी शाळा आहेत. शिक्षण मंडळाच्या एकूण शाळांपैकी ५१ शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत, असेही या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. महापालिकेतर्फे चालवल्या जात असलेल्या मराठी माध्यमाच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्या किती आहे, प्रत्येक शाळेत शिक्षकांची संख्या किती आहे, असेही प्रश्न नगरसेविका वाडकर यांनी विचारले आहेत. मात्र सदरची माहिती विस्तृत स्वरूपाची असल्याने ती मंडळाकडे पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असे उत्तर देण्यात आले आहे. त्याबरोबरच कोणत्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक जास्त आहेत तसेच कोणत्या शाळेत पटसंख्येनुसार शिक्षक कमी आहेत, असेही प्रश्न विचारण्यात आले असले तरी त्यांचेही उत्तर, ही माहिती मंडळामध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे असे देण्यात आले आहे.