गेल्या काही वर्षांपासून शिक्षण मंडळापुढे त्याच त्या समस्या असून, सभापती अथवा सदस्यांनी तीच आश्वासने पुन:पुन्हा दिली आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, मंडळाची ढासळलेली प्रतिमा, आयुक्त व मंडळातील समन्वय अशा अनेक पातळींवर नवे सभापती धनंजय भालेकर यांना काम करावे लागणार आहे. बदललेली राजकीय परिस्थिती व त्यामुळे निर्माण होणारे कृत्रिम प्रश्न पाहता त्यांच्यापुढे कडवे आव्हानच राहणार आहे.
शिक्षण मंडळाचे स्थापत्यविषयक काम महापालिकेचे अधिकारी पाहतात. सुधारणांचे काम मंडळाकडे तर स्वच्छतेचे काम माध्यमिक विभागाकडे आहे. या कामांची एकत्रित मोट बांधून त्याचे नियंत्रण शिक्षण मंडळाकडे द्यावे, त्यासाठी स्थापत्य विभागातील वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावा, अशी मंडळाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याचा कधीही गांभीर्याने विचार झाला नाही. ई-लर्निग, शिक्षकांची बायोमॅट्रिक्स पद्धतीने हजेरी, संगणक लॅब, इंग्रजी माध्यमाच्या शाळा अशा अनेक घोषणा प्रत्यक्षात उतरू शकल्या नाहीत. शाळांमधील दुरवस्था व स्वच्छतेची बाराही महिने ओरड आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीतील विषय दरवर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडतो, त्याला कोणीही अपवाद राहिले नाही. आतापर्यंतच्या अनेक सभापतींनी, सदस्यांनी यादृष्टीने प्रयत्न केले. मात्र, पालिका प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती राहिली आहे. धनंजय भालेकर यांनी या सर्व गोष्टींचे भविष्यात नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. थरमॅक्स कंपनीच्या सहकार्याने सुरू केलेल्या दोन शाळांची संख्या सहापर्यंत वाढवू, चार टप्प्यांत ई-लर्निगचा विषय मार्गी लावू, १० संगणक लॅब उभारू, शाळांमध्ये ग्रीन बोर्ड सुरू करू. शिक्षकांना आणखी प्रशिक्षित करू. शाळांचा दर्जा सुधारू, पटसंख्या वाढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.