पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या अजब कारभाराचे अनेक नमुने वेळोवेळी उघडकीस येत असतानाच मंडळाने बिले न भरल्यामुळे मंडळाचे दूरध्वनी तोडण्यात आल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. दूरध्वनींबरोबरच काही शाळांमधील विजेचे जोडही वीज वितरण कंपनीने तोडले आहेत आणि त्याचेही कारण बिल थकले असेच आहे.
शालेय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, भरती प्रक्रियेतील गैरप्रकार, विविध कार्यक्रम आयोजित करताना होणारे लाखो रुपयांचे बेकायदेशीर खर्च, शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रकार आदी अनेक कारणांनी शिक्षण मंडळ नेहमीच वादग्रस्त ठरत असते. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले असले, तरी सध्याच्या मंडळाला त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार शिक्षण मंडळाचा कारभार पुणे महापालिकेकडे आला आहे. मात्र अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
शिक्षण मंडळाच्या अकार्यक्षमतेवर महापालिकेच्या सभेत शुक्रवारी चर्चा सुरू असताना दूरध्वनी तोडल्याचा मुद्दा निघाला. मनसेचे बाळा शेडगे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मंडळाने टेलिफोनची बिले न भरल्यामुळे मंडळाचे सर्व दूरध्वनी तोडण्यात आल्याचे सांगताच सभेत सर्वच सदस्यांना धक्का बसला. मंडळ बिले देखील भरू शकत नाही अशी परिस्थिती आहे का, अशीही विचारणा यावेळी करण्यात आली. जशी टेलिफोनची बिले भरण्यात आलेली नाहीत, तशीच वीज मंडळाचीही बिले भरलेली नाहीत. त्यामुळे काही शाळांमधील वीजही तोडण्यात आली आहे, अशीही माहिती शेडगे यांनी दिली.
या पाठोपाठ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये देण्यात आलेले अभ्यासक्रमाचे पेनड्राईव्ह शिक्षकांकडून काढून घेण्यात आल्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार मंजुषा नागपुरे यांनी केली. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आधीच शिक्षक नाहीत आणि निदान पेनड्राईव्हच्या साहाय्याने तरी काही शिक्षक अभ्यास घेऊ शकत होते, तर ती सुविधाही बंद झाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

टेलिफोनची बिले पूर्वी शिक्षण मंडळामार्फत भरली जात असत. मंडळाचा कारभार आता महापालिकेकडे आल्यामुळे ती महापालिकेकडे पाठवली जातात. मात्र, त्याबाबतची माहिती संबंधित कर्मचाऱ्याला नव्हती. त्यामुळे या प्रक्रियेला उशीर झाला आहे. तसेच ज्या कंपनीकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करून घेण्यात आला होता त्यांच्या ठेक्याची मुदत संपल्यामुळे संबंधित कंपनीने अभ्यासक्रम असलेले पेनड्राईव्ह परत नेले आहेत. दोन दिवसात नवीन करार करून पेन ड्राईव्ह परत दिले जातील.
बबन दहिफळे, शिक्षण प्रमुख, महापालिका शिक्षण मंडळ