शिक्षण मंडळात झालेल्या कुंडय़ा खरेदीच्या गैरव्यवहाराला मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी हेही जबाबदार असल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी मंडळावर कुंडी मोर्चा काढण्यात आला.
शिक्षण मंडळाने शाळा सुशोभीकरणासाठी कुंडय़ांची खरेदी केली असून बाजारात शंभर रुपयांना एक या दराने मिळणाऱ्या कुंडय़ांची खरेदी मंडळाने एक हजार रुपयांना एक याप्रमाणे केली आहे. मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी या बाबत गेल्या आठवडय़ात सर्वप्रथम स्थायी समितीमध्ये आवाज उठवला होता. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या मुख्य सभेतही हा विषय गाजला. या खरेदीची चौकशी केली जाणार असून तोपर्यंत शिक्षण प्रमुख तुकाराम सुपे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
कुंडय़ांच्या या खरेदीला शिक्षण प्रमुखांएवढेच मंडळाचे अध्यक्षही जबाबदार आहेत. खरेदीच्या धनादेशावर त्यांचीही स्वाक्षरी आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, या मागणीसाठी मनसेतर्फे सोमवारी मंडळावर कुंडी मोर्चा काढण्यात आला. मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे, प्रकाश ढोरे तसेच गटनेता वसंत मोरे, नगरसेवक राजू पवार, पुष्पा कनोजिया, रुपाली पाटील, सुशीला नेटके, मंडळाच्या सदस्या विनिता ताटके यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कुंडय़ांची खरेदी करताना शाळा सुधार समितीच्या नावाने धनादेश काढणे आवश्यक होते. मात्र तसे न करता मुख्याध्यापकांना हे धनादेश काढायला लावण्यात आले. धनादेश ठेकेदाराच्या हातात देऊन पैशांची वसुली करण्यात आली. या गैरप्रकाराला जबाबदार असल्याबद्दल अध्यक्षांनी राजीनामाच दिला पाहिजे. जी कुंडी, रोप आणि माती आम्ही तीस रुपयात खरेदी केली त्याच कुंडीला मंडळाने एक हजार रुपये मोजले आहेत. हा निश्चितपणे गैरव्यवहारच आहे. त्यामुळे अध्यक्षांनी राजीनामाच दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे मोरे यांनी यावेळी सांगितले. या गैरव्यवहाराच्या विरोधात मनसेने आंदोलन सुरू केले असून ते पुढेही चालू राहील, असेही ते म्हणाले.