|| बाळासाहेब जवळकर

टक्केवारीच्या राजकारणामुळे शिक्षण मंडळे बदनाम होती. आता नव्या स्वरूपात शिक्षण समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाचे कामकाज होणार आहे. शाळांची दुरवस्था, ढासळलेली गुणवत्ता, विद्यार्थ्यांची गळती, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न या सर्वच गोष्टीत भरीव सुधारणा करत शिक्षण समितीला आपले वेगळेपण दाखवावे लागणार आहे. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून नियोजन ठेवल्यास काही अडचणी येणार नाहीत. अन्यथा, मंडळाच्या ऐवजी समिती आली तरी गैरकारभार तसाच राहिला, असे होता कामा नये.

बदनाम झालेली शिक्षण मंडळे बरखास्त झाली आणि रडतखडत शिक्षण समिती अस्तित्वात आली. राजकीय सत्तांतराच्या सव्वा वर्षांनंतर पिंपरी महापालिकेतील पहिली शिक्षण समिती स्थापन झाली. सत्तारूढ भाजपच्या भोसरीतील प्रा. सोनाली गव्हाणे यांना सभापतिपदाची तर निगडी-प्राधिकरणातील शर्मिला बाबर यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली. समितीच्या एकूण नऊ सदस्यांमध्ये आठ महिला आहेत. राष्ट्रवादीचे राजेंद्र बनसोडे यांनी या समितीचे सदस्यत्व आपल्याला नको आहे, अशी विनंती पक्षनेत्यांना केली आहे. शिक्षण समितीच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि समितीतील सर्वच सदस्य नवखे आहेत. त्यामुळे समितीचे कामकाज समजून घेणे व त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना त्यांच्यापुढे मोठे आव्हान राहणार आहे.

महापालिका शाळांचा दर्जा सुमार असतो, हा सर्वदूर पसरलेला समज सर्वात आधी दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी शाळांची गुणवत्ता सुधारली पाहिजे. शिक्षण विभागासाठी महापालिकेकडून कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येतात. त्या तुलनेत सकारात्मक परिणाम मात्र दिसून येत नाहीत, हे जुने दुखणे आहे. महापालिका शाळांमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाटय़ाने कमी होत आहे. ही गळती रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

शाळा इमारतींची दुरवस्था आहे. शाळांमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून येते. शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. आतापर्यंत खाबुगिरी आणि टक्केवारीचे राजकारण हीच शिक्षण मंडळांची ओळख होती. महापालिकेचे अपेक्षित नियंत्रण नव्हते. ठेकेदार आणि पुरवठादारांच्या तालावर मंडळे चालत होती. कोटय़वधींचा गैरव्यवहार होत होता. विद्यार्थी हिताला तिलांजली दिली जात होती. त्यामुळे पिंपरीतील शिक्षण विभागाचा गैरकारभार हा कायम टीकेचा विषय होता. बदलत्या परिस्थितीत त्यात सुधारणा करून खऱ्या अर्थाने काही तरी चांगल्या आणि विद्यार्थी हिताच्या गोष्टी होणे गरजेचे आहे.

भाजप-शिवसेनेतील संघर्ष

क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाचे पोस्टाचे टपाल तिकीट केंद्र सरकारने प्रकाशित केले. या टपाल तिकिटाचे प्रकाशन चिंचवड येथील चापेकर वाडय़ात झाले. हा तसा पूर्णपणे वेगळा आणि अराजकीय कार्यक्रम होता. तरीही त्यावरून भाजप-शिवसेनेचे राजकारण ढवळून निघाले व त्यांच्यातील सुप्त संघर्ष दिसून आला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या तिकिटासाठी पाठपुरावा केला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रकाशन व्हावे, यासाठी त्यांचेच प्रयत्न होते. बारणे यांचा प्रभाव असणाऱ्या कार्यक्रमासाठी महाजन प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात येत होत्या. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता होती. आगामी लोकसभेत भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास बारणे हे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यांच्याशी दोन हात करावे लागणार म्हणून भाजप नेते आतापासून तयारीत आहेत. असे असताना, संघ परिवाराशी संबंधित संस्थेच्या या कार्यक्रमाचे श्रेय शिवसेनेला मिळावे, ही बाब भाजप नेत्यांच्या पचनी पडली नाही. पडद्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. पक्षाचे आमदार, पदाधिकारी, नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. भाजप पदाधिकाऱ्यांना चिंचवड येथेच स्वतंत्रपणे महाजन यांची भेट घ्यावी लागली. बारणे यांनी या व्यासपीठावरून राजकीय शेरेबाजी केली. खासदार म्हणून केलेल्या कामांची जंत्रीही सादर केली. या निमित्ताने चिंचवड परिसरात भाजप आणि शिवसेनेचे फलकयुद्धही दिसून आले, ही आगामी संघर्षांची नांदी ठरू शकेल.

वाढदिवसाच्या नावाखाली धांगडिधगा

आतापर्यंत घरगुती पद्धतीने साजरे होणारे वाढदिवस रस्त्यावर आले आणि शहरात नको ते उद्योग सुरू झाले. सुरुवातीला रस्त्यावर केक कापण्यात येत होते. त्यानंतर तलवारीने केक कापण्याचे प्रकार सुरू झाले. भरधाव गाडय़ांचा कर्कश आवाज करत हुल्लडबाजी होऊ लागली. मध्यरात्रीच्या सुमारास तासन्तास फटाके वाजत राहतात. मोठय़ा आवाजात ध्वनिवर्धकावरून गाणी वाजवण्यात येऊ लागली. हे कमी म्हणून की काय, रविवारी (८ जुलै) यशवंतराव चव्हाण रुग्णालय परिसरातही धूडगूस घालत वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. गेल्या वर्षी कासारवाडी-नाशिक फाटा पुलावर मध्यरात्री एका आमदार पुत्राला पोलिसांनी मित्र-मैत्रिणीसह वाढदिवस साजरा करू दिला नाही म्हणून बराच काथ्याकूट झाला होता. राजरोसपणे हे सगळे प्रकार का होतात, तर असे उद्योग करणाऱ्यांना कोणाचेही भय नाही. पोलीस आपले काही वाकडे करू शकत नाही, हीच भावना सार्वत्रिकपणे दिसून येते. त्यामुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. बऱ्याच काळापासून चालत आलेले हे चित्र आता बदलले पाहिजे. अन्यथा भविष्यात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होईल. अशा पद्धतीने हैदोस घालणारे कोणाचे तरी बगलबच्चे असणार, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. राजकारण्यांनी अशा प्रवृत्तींना खतपाणी घालता कामा नये. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तोडपाणी करून प्रकरण मिटवण्याचा मोह आवरला तरच, वाढदिवसाच्या नावाखाली धांगडिधगा घालण्याचे फालतू प्रकार बंद होतील.

balasaheb.javalkar@expressindia.com