‘सध्याची शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना शब्दांचे प्रतिशब्द शिकवते, पण त्याचा अर्थ शिकवत नाही. आजच्या शिक्षणात कृत्रिमपणा आला आहे,’ अशी खंत डॉ. न. म. जोशी यांनी शनिवारी व्यक्त केली. डॉ. जोशी यांनी ८० व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
निनाद, पुणे या संस्थेतर्फे ८० व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल डॉ. न. म. जोशी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते जोशी यांना ‘ज्ञानयोगी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी सिम्बॉयोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, डॉ. दिलीप गरुड आदी उपस्थित होते.
‘शाळेत असताना मी वृत्तपत्र टाकत असे. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी वृत्तपत्र दिले होते. त्यांनी रुपया दिला. वृत्तपत्राची किंमत घेऊन उरलेले १४ आणे परत दिले. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी या पैशाची पुस्तके आणून वाच आणि मोठा हो, असा आशीर्वाद दिला. त्या क्षणाने मला घडवले. त्यानंतर पु. ग. सहस्रबुद्धे यासारख्या अनेक व्यक्तींचा प्रभाव विचारांवर राहिला. त्यामुळेच आजपर्यंत आठशे व्यक्तींवर कथा लिहू शकलो,’ अशा शब्दात डॉ. जोशी यांनी आपला प्रवास उलगडला. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी त्यांना बोलते केले.