शिक्षणाच्या माध्यमातून मुलांवर संस्कार केले जात असत आणि त्यातून त्यांच्या संवेदनशीलतेचा विकास होत असे. मात्र, सध्याच्या पद्धतीमध्ये शिक्षणातून केवळ व्याकरण आणि शब्दांवर भर दिला जात असून संवेदनशीलता हद्दपार झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.
भारतीय विद्या भवन आणि अॅड. डी. आर. नगरकर फाउंडेशनतर्फे भवनचे उपाध्यक्ष अरुण फिरोदिया आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आगाशे यांना अॅड. डी. आर. नगरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाउंडेशनचे डॉ. अरिवद नगरकर, शर्मिला नगरकर आणि प्रा. नंदकुमार काकिर्डे या वेळी उपस्थित होते.
आगाशे म्हणाले, पाठय़पुस्तकांचा कंटाळा येऊ नये म्हणून मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करायला हवी. सध्याची पाठय़पुस्तके केवळ वैचारिक शिक्षण देणारी आहेत. त्यातून आयुष्य केवळ शब्दबंबाळ होत आहे. शिक्षणातून जगण्याचा आनंद घेता येईल अशा पाठय़पुस्तकांची रचना करायला हवी.
मोहन आगाशे यांनी भारतीय नाटक जगभरात नेण्यासाठी अपार कष्ट घेतले असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. नाटक-चित्रपटातील अभिनय आणि मानसशास्त्र यांचा त्रिवेणी संगम असल्याने ते भूमिका जिवंत करतात. माणुसकी आणि कमालीची संवेदनशीलता यामुळे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आगाशे हे सामाजिक भान असलेले रंगकर्मी आहेत, असेही त्यांनी सांगितले. अरुण फिरोदिया यांनी अध्यक्षीय समारोप केला. काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला नगरकर यांनी मानपत्राचे वाचन केले.