नवे शैक्षणिक वर्ष तोंडावर आहे. मात्र, या वर्षी शिक्षण अधिकच महागणार असून शाळांच्या शुल्काबरोबरच पुस्तके, वह्य़ा, दप्तर अशा शिक्षण साहित्याच्या किमतीतही दहा ते पंधरा टक्क्य़ांची वाढ झाली आहे.
राज्यातील शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळांनी त्यांच्या शुल्कामध्ये १५ टक्क्य़ांनी वाढ यापूर्वीच केलेली आहे. त्याचबरोबर आता शिक्षण साहित्याच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे दप्तर, पुस्तके, वह्य़ा अशा शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण अधिकच महागले असल्याचे दिसत आहे. या वर्षी तिसरी आणि चौथीची पुस्तके बाजारात नव्याने आली आहेत. पुस्तकांची संख्या कमी झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांच्या किमतीही वाढल्या आहेत. तिसरी आणि चौथीच्या पुस्तकांचा संच गेल्यावर्षी साधारण १५० रुपयांपर्यंत मिळत होता, तो या वर्षी २५० रुपयांपर्यंत आहे. ब्रँडेड वह्य़ांच्या किमतीतही साधारणपणे पंधरा टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे दिसत आहे, अशी माहिती नटराज बुक डेपोचे रितेश किंगर यांनी दिली.
शाळेच्या खरेदीमधील मोठा घटक म्हणजे दप्तर. या वर्षी लहान मुलांसाठी आलेल्या दप्तरांमध्ये छोटा भीम आणि त्याच्या बरोबरची चुटकी, कालिया यांचे वर्चस्व दिसत आहे. लहान मुलांसाठी प्रिटिंग असणाऱ्या दप्तरांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अगदी लहान मुलांसाठीची दप्तरे १२० रुपयांपासून पुढे आहेत. दप्तरांच्या किमतीतही या वर्षी वाढ झाली आहे. बहुतेक शाळांची गणवेश खरेदी ही शाळांनी सुचवलेल्या दुकानांमधूनच करावी लागते. त्यामुळे काही वेळा बाजारातील सर्वसाधारण किमतीपेक्षा गणवेश महाग मिळत असल्याचे मत पालक नीरजा कुलकर्णी यांनी नोंदवले. अनेक शाळांमध्ये रोज एक गणवेश, खेळाच्या तासासाठी स्वतंत्र गणवेश आणि आठवडय़ातील एक दिवस स्वतंत्र गणवेश अशी पद्धत आहे. साधारणपणे या तिनही संचांची किंमत ही अडीच हजारांपासून पाच हजारांपर्यंत आहे. या शिवाय वॉटरबॅग, डबा, कंपासपेटी अशा वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. या वस्तूंच्या किमतींमध्येही साधारण १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे.