शिक्षण मंडळाचा कारभार चालवण्यासाठी आवश्यक अधिकार द्यावेत, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली. दरम्यान, मंडळाच्या सदस्यांना त्यांचे अधिकार द्यावेत असे पत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही महापालिकेला पाठवले आहे.
शिक्षण मंडळाचा कारभार कोणी पाहायचा याबाबत वाद असून, शासनाच्या आदेशानंतरही महापालिका प्रशासनाने मंडळाचे अधिकार स्वत:कडे ठेवले असल्याची तक्रार आहे. शिक्षण मंडळाच्या विद्यमान सदस्यांना मंडळाचा कारभार पाहण्यासाठी पूर्वीप्रमाणेच अधिकार द्यावेत, असा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत गेल्या आठवडय़ात घेण्यात आला. या निर्णयानंतरही अद्याप मंडळाच्या सदस्यांना अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदस्यांना अधिकार द्यावेत या मागणीसाठी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृहनेता सुभाष जगताप, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आयुक्तांची भेट घेतली.
शिक्षण मंडळाला अधिकार द्यावेत असा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने एकमताने केला आहे. त्यानुसार अधिकार द्यावेत, अशी विनंती या वेळी करण्यात आली. मंडळाचे सदस्य आणि अन्य पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते. शिक्षण मंडळाच्या सदस्यांना अधिकार देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी महापालिकेला पत्र पाठवले आहे. त्यानुसार आता अधिकार द्यावेत, अशीही चर्चा या वेळी झाली. ठराव झाल्यानंतर त्याची कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेतला जाईल, असे या वेळी आयुक्तांनी सांगितले.
मुख्य सभेने केलेल्या ठरावाची आणि शिक्षणमंत्र्यांच्या पत्राची प्रत आम्ही या वेळी आयुक्तांना दिली. त्यानुसार अधिकार मिळावेत अशी आमची विनंती आहे, असे अध्यक्ष धुमाळ यांनी सांगितले.