19 January 2021

News Flash

नव्या शैक्षणिक वर्षांबरोबर रॅगिंगच्या तक्रारीही सुरू

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत राज्यातून ४ विद्यार्थ्यांनी रॅगिंगबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत.

| July 29, 2015 03:10 am

महाविद्यालयांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच रॅगिंगच्या तक्रारीही सुरू झाल्या आहेत. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत राज्यातून ४ विद्यार्थ्यांनी रॅगिंगबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील महाविद्यालयांमध्ये रॅगिंगचे प्रकार कमी झाले असले, तरीही अद्यापही पूर्ण थांबलेले नाहीत. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच महाविद्यालयामध्ये रॅगिंग होत असल्याच्या ४ तक्रारी मदतवाहिनीवर नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या कक्षेत येणाऱ्या महाविद्यालयांबाबत या तक्रारी आहेत. या तक्रारींनुसार रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईही झाली आहे.
देशपातळीवर रॅगिंगबाबत जागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी मदतवाहिनी चालवली जाते. २००९ पासून ही मदतवाहिनी कार्यरत आहे. या मदतवाहिनीच्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात १३१ विद्यार्थ्यांनी रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांबाबत आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली सर्वाधिक म्हणजे ४७ तक्रारींची नोंद करण्यात आली होती. या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये आतापर्यंत ८ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यातील ४ नव्या शैक्षणिक वर्षांतील म्हणजे जून आणि जुलै महिन्यातील आहेत.
रॅगिंग होत असल्यास काय कराल?
महाविद्यालयांत रॅगिंग होत असेल किंवा महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांकडून मानसिक किंवा शारीरिक छळ केला जात असेल, तर त्याची तक्रार महाविद्यालय प्रशासनाकडे करावी. विद्यार्थी किंवा त्यांचे पालक तक्रार करू शकतात. जवळच्या पोलिस ठाण्यातही रॅगिंग होत असल्यास तक्रार करता येते. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सुरू केलेल्या मदतवाहिनीवरही तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाते.
रॅगिंगबाबत गेल्या पाच वर्षांतील तक्रार
२०११    ४०
२०१२    १५
२०१३    २७
२०१४    ४१
२०१५    ८
तक्रार कुठे कराल?
१८००-१८०-५५२२ या टोल फ्री क्रमांकावर २४ तास तक्रार करता येऊ शकते.
helpline@antiragging.in या संकेतस्थळावरही तक्रार दाखल करता येऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2015 3:10 am

Web Title: educational year ragging complaint
टॅग Complaint,Ragging
Next Stories
1 शिक्षण मंडळाच्या बावीस अधिकाऱ्यांवर कारवाई
2 पुणे-मुंबई मार्गावर अडकणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक सोयी-सुविधांविना प्रचंड कुचंबणा
3 पुणे रेल्वे स्थानक इमारत.. वय वर्षे नव्वद!
Just Now!
X