जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न

पुणे:  शहरात लागू करण्यात आलेले वाहतुकीवरील निर्बंधतसेच जमावबंदी, संचारबंदीबाबत पुणे पोलिसांनी लागू केलेले आदेश कायम राहणार आहेत. किराणा माल, दूध, फळभाजी, औषध विक्रेत्यांना र्निबधातून सूट देण्यात आलेली असून नागरिकांनी भीतीपोटी गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२४ मार्च) देशभरातील दैनंदिन व्यवहारावर निर्बंधघालण्याचे (लॉकडाऊन) आदेश दिले. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी पुढील २१ दिवस घरात थांबावे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये तसेच प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर रात्री शहरातील किराणा माल विक्रेते, औषध विक्रेत्यांच्या दुकानांसमोर रांगा लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नागरिकांनी भयभीत होऊ नये तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याचा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित केला.

याबाबत सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे म्हणाले, शहरात वाहन वापरास तसेच वाहतुकीवर निर्बंधघालण्याबाबतचा आदेश ३१ मार्चपर्यंत यापूर्वीच लागू करण्यात आला आहे तसेच शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशातून पोलीस, आरोग्य विभाग, रुग्ण वाहतूक, अत्यावश्यक सेवेतील वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, अग्निशमन, बँक, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवरील पायाभूत विकासाशी संबंधित उद्योग, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक , वृद्धाश्रम, अपंग संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवा, प्रसारमाध्यम आणि त्यांच्या प्रतिनिधींना सूट दिलेली आहे.

संपर्क साधा

नागरिकांना काही सूट हवी असल्यास ती केवळ अपवादात्मक परिस्थितीत मिळणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक पुढीलप्रमाणे- ९१४५००३१००, ८९७५२८३१००, ९१६९००३१००, ८९७५९५३१००.

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र, निवासस्थान तसेच कार्यालयाचा पुरावा जवळ बाळगावा. आपत्कालीन, वैद्यकीय सेवेसाठी डायलरिक्षा (मोबाइल क्रमांक ९८५०९१९८५९१) या अ‍ॅपचा वापर करावा. रुग्ण वाहतुकीच्या वेळी रुग्णालयातील कागदपत्रे बाळगावी.

– डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त