थंडीत अंडय़ांचे सेवन वाढले; पुणे, मुंबई, ठाण्यात दररोज दीड कोटी अंडय़ांचा खप

पुणे : करोना संसर्गात मुबलक प्रथिने असलेली अंडी सेवन करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात असल्यामुळे तसेच थंडीमुळे राज्यात अंडय़ांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असून दरही तेजीत आहेत. पुणे-मुंबई, ठाणे या तीन शहरांत सध्या दररोज दीड कोटी अंडी खपत आहेत तर देशातील खप प्रतिदिन वीस ते पंचवीस कोटींवर गेला आहे.

दरवर्षी थंडीत अंडय़ांना मागणी वाढते. मात्र, यंदा करोनाच्या संसर्गामुळे अंडय़ांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. नाताळ सण, नववर्ष स्वागतासाठी केक उत्पादकांकडून अंडय़ांना मागणी आहे तसेच हॉटेल व्यावसायिकांसह किरकोळ ग्राहकांकडून अंडय़ांना मागणी आहे. मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. मागणी वाढली तरी अंडय़ांच्या पुरवठा सुरळीत आहे. पुणे शहर परिसरात पुणे जिल्ह्य़ातील कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून अंडी विक्रीस पाठविली जातात, तसेच सांगलीतील विटा, सातारा परिसरातून अंडय़ाची आवक होत आहे, असे शीतल अ‍ॅग्रोटेकचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अंडय़ाचा तुटवडा जाणवल्यास हैदराबाद, कर्नाटकातील कुक्कटपालन व्यावसायिकांकडून अंडय़ाची खरेदी केली जाते. मात्र, सध्या मागणीच्या तुलनेत अंडय़ाचा पुरवठा पुरेसा होत आहे.

अंडय़ांचे तुलनात्मक दर

महिना         अंडी            शेकडा                           डझन                एक नग

डिसेंबर         इंग्लिश        ५५० रुपये                     ७२ रुपये          ६ रुपये

गावरान      ८७० रुपये                      १२० रुपये        १० ते ११ रु.

नोव्हेंबर        इंग्लिश        ४५० ते ५५० रु.              ६६ रुपये         साडेपाच रु.

गावरान       ७५० रुपये                     १०९ रुपये        ९ रुपये

मुंबई, ठाणे, पुणे शहरात दररोज सव्वा ते दीड कोटी अंडय़ांची विक्री होत आहे. राज्याच्या विचार करता अडीच कोटी अंडी दररोज खपत आहेत. संपूर्ण देशात दररोज २२ ते २५ कोटी अंडी खपत आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांचा विचार केल्यास शेतीमाल तसेच अन्य उत्पादनांच्या किमती पाहता अंडय़ाचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. माफक दरात अंडय़ातून प्रथिने मिळतात. करोनाच्या संसर्गात नागरिक जागरूक झाले आहेत. अंडय़ाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. नवीन वर्षांतही अंडय़ांना वाढती मागणी राहणार आहे.

– डॉ. प्रसन्न पेडगांवकर, महाव्यवस्थापक, वेंकटेश्वरा हॅचरिज

अंडय़ांमध्ये प्रथिने उच्च दर्जाची आहेत. अंडय़ातील प्रथिनांचा उपयोग शरीरासाठी चांगल्या पद्धतीने होतो. प्रथिनांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. अंडय़ातील पिवळ्या बलकात ‘ड ’ जीवनसत्त्व आहे तसेच अंडय़ात ओमेगा थ्री असते.  आहारपद्धतीत प्रथिनांचे प्रमाण कमी असते.  प्रोटिन पावडर घेण्यापेक्षा अंडय़ांचे सेवन करणे कधीही चांगले असते. अंडी स्वस्तही आहेत. एका अंडय़ाचे वजन साधारणपणे ५० ते ६० गॅ्रम असते. एका अंडय़ात सहा गॅ्रम प्रथिने असतात. शक्यतो कच्चे अंडे खाऊ नये. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते.

– अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ