अल्पवयीन मुलगा ताब्यात ’ पालकांसोबत वाद झाल्याने जाळपोळ

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर तसेच उपनगरात किरकोळ वादातून दुचाकी पेटवण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वाहनांची तोडफोड करणे तसेच ती पेटवून देण्याच्या घटना शहरात विशेषत: उपनगरात मोठय़ा प्रमाणावर घडतात. सदाशिव पेठेतील चिमणबाग भागात असलेल्या वेस्टर्न इंडिया सोसायटीतील रहिवाशांनी लावलेल्या आठ दुचाकी मध्यरात्री पेटवून देण्यात आल्या. घटनेमुळे चिमणबागेतील रहिवासी भयभीत झाले असून, दुचाकी पेटवण्याचे लोण आता सदाशिव पेठेत पोहोचले, अशी प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर याच सोसायटीत राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने दुचाकी पेटवल्याची माहिती मिळाली. अल्पवयीन मुलाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून आई-वडिलांशी भांडणे झाल्याने त्याने सोसायटीतील दुचाकी पेटवल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून वेस्टर्न इंडिया सोसायटीत राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून आई-वडिलांसोबत वाद झाल्याने त्याने मध्यरात्री सोसायटीच्या बाहेर लावलेल्या दुचाकी पेटवून दिल्याची माहिती पोलिसांना दिली. दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमृत मराठे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, मुलाणी, हवालदार शरद वाकसे, बाबा दांगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी संशयावरून काही जणांची चौकशी सुरू केली. तेव्हा सोसायटीत राहणाऱ्या पंधरा वर्षीय मुलाच्या संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने आई-वडिलांशी वाद झाल्याने दुचाकी पेटवून दिल्याची कबुली दिली.

टिळक रस्त्यानजीक असलेल्या चिमणबाग भागात भारतीय आयुर्विमा महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी वेस्टर्न इंडिया सोसायटी ही इमारत १९५६ मध्ये बांधण्यात आली. तीनमजली इमारतीत बत्तीस खोल्या आहेत. सोसायटीतील रहिवासी इमारतीच्या समोर असलेल्या मोकळय़ा जागेत त्यांच्या दुचाकी लावतात. रात्री या भागात फारशी गर्दी नसते. नेहमीप्रमाणे सोसायटीतील रहिवाशांनी त्यांच्या दुचाकी इमारतीच्या बाहेर लावल्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीच्या बाहेर लावण्यात आलेल्या दुचाकी पेटवून देण्यात आल्या. मोठय़ा प्रमाणावर धूर आणि पेट्रोलच्या टाक्या फुटल्याने स्फोटासारखे आवाज झाले. गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना इमारतीच्या बाहेर लावलेल्या दुचाकींनी पेट घेतल्याची माहितीदेखील नव्हती.

वेस्टर्न इंडिया सोसायटीच्या समोर असलेल्या एका सोसायटीतील रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचा बंब आणि एक रुग्णवाहिका काही वेळात घटनास्थळी दाखल झाली. तांडेल प्रकाश कांबळे,  ज्ञानेश्वर खेडेकर, प्रवीण रंधवे, संजय पाटील, कोंडिबा जोरे, नाईकनवरे यांनी पाण्याचा मारा करून पाच ते दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली. सोसायटीतील रहिवासी शारदा साळेकर, सुनीता बारावकर म्हणाल्या, की सोसायटीचे प्रवेशद्वार रात्री उघडे असते. सोसायटीतील रहिवाशांनी नेहमीप्रमाणे इमारतीच्या समोर असलेल्या जागेत दुचाकी लावल्या. मध्यरात्री गाढ झोपेत असताना आरडाओरडा ऐकून आम्ही जागे झालो. बाहेर डोकावून पाहिले तर इमारतीच्या बाहेर लावलेल्या दुचाकी पेटवून दिल्याचे निदर्शनास आले. सोसायटीतील रहिवाशांनी पेटलेल्या दुचाकींवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीत सोसायटीतील रहिवासी साळेकर, जोगळेकर, बारावकर, दाभेकर, शिंदे, जोशी यांच्या दुचाकी जळाल्या.

गेली ६१ वर्षे आम्ही चिमणबाग परिसरात राहायला आहोत. हा परिसर शांत आहे. अशा प्रकारची घटना यापूर्वी घडली नव्हती. मध्यरात्री वेस्टर्न इंडिया सोसायटीच्या समोर लावलेल्या वाहनांनी पेट घेतला. फटाक्यासारखा आवाज आल्याने मी झोपेतून जागा झालो. त्यानंतर या भागातील दोनशे ते अडीचशे रहिवासी तातडीने रस्त्यावर आले. त्यांनी इमारतीच्या परिसरात लावलेली दुचाकी वाहने तातडीने बाजूला काढली. पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

माधव कुलकर्णी (वय ६६), रहिवासी, चिमणबाग परिसर