पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या कस्तुरी मिलिंद कुलकर्णी हिने आयुर्वेदातील उपचार पद्धती या विषयावर केलेल्या लघुपटाची दखल भारत सरकारच्या विज्ञान प्रसार खात्याने घेतली आहे. आजीबाईचा बटवा असे कस्तुरीने तयार केलेल्या लघुपटाचे नाव असून विज्ञान प्रसार विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये या लघुपटाची निवड करण्यात आली आहे. १३ ते १५ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांनी या लघुपटात काम केले आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कस्तुरीने केले आहे.

पुरातन काळापासून चालत आलेल्या घरगुती औषधांची माहिती कस्तुरीने या लघुपटातून दिली असून आजच्या काळात या औषधांचे असलेले महत्त्वही त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. देशभरातून या महोत्सवासाठी २५० लघुपट आले होते. त्यापैकी १६ लघुपटांची निवड महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

२० ते २४ फेब्रुवारी दरम्यान गुवाहाटी येथे भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सवात हा लघुपट दाखवला जाणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान प्रसार विभागातर्फे कस्तुरीला या महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.