भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडमध्ये मोठय़ा संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. दौडच्या सुरुवातीला राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली.
पुणे जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सातच्या सुमारास खंडोजीबाबा चौकातून दौडची सुरुवात करण्यात आली. महापौर दत्ता धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार दिलीप कांबळे, विभागीय आयुक्त विकास देशमुख, पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी ध्वज दाखवून दौडची सुरुवात केली.
खंडोजीबाबा चौकातून फग्र्युसन रस्ता, ज्ञानेश्वर पादुका चौक या मार्गाने शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदान येथे दौडचा समारोप करण्यात आला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी, राजकीय कार्यकर्त्यांसह समाजातील विविध घटकातील नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. क्रीडा क्षेत्रातील अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, काका पवार, मनोज िपगळे, शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, किशोरी शिंदे, बाळासाहेब लांडगे, प्रल्हाद सावंत, प्रताप जाधव, गुरुबन्स कौर आदींनीही सहभाग घेतला. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील आदी या वेळी उपस्थित होते.