प्रचारासाठी मैदाने हवी असल्याची राजकीय पक्षांकडून मागणी होते. ती मिळाली नाहीत तर आरडाओरडाही होतो, पण सभांसाठी संभाव्य मैदानांची यादी व सुरक्षितता याबाबत पोलिसांनी पूर्वसूचना देऊन बोलविलेल्या बैठकीला केवळ दोन राजकीय पक्षाचे चार पदाधिकारी उपस्थित होते. बाकीचे या बैठकीकडे फिरकलेसुद्धा नाहीत. आता ही बैठक शनिवारी, ४ ऑक्टोबर रोजी बोलविण्यात आली आहे.
शहरातील विधानसभेचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. रोड शो, रॅली सुरू झाल्या आहेत. आता दोन दिवसांनंतर शहरात उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचार सभांचा धुराळा उडणार आहे. या प्रचार सभा घेण्यासाठी संबंधित पक्षांनी दोन दिवस अगोदर पोलिसांची परवानगी घेण्याच्या सूचना सर्व राजकीय पक्षांना झालेल्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. तसेच, आपल्या भागात सभांसाठी असणाऱ्या मैदानांची यादी घेऊन १ ऑक्टोबरला पोलिसांसोबतच्या बैठकीत हजर राहण्याच्या सूचना राजकीय पक्षांना दिल्या होत्या. याबाबत एक ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षांसोबत पोलिसांची बैठक झाली. मात्र, या बैठकीला फक्त काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे मैदानाची यादी पोलिसांना मिळालेली नाही. विशेष शाखेकडून ४ ऑक्टोबरला पुन्हा राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यांना या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचार सभा घेण्यासाठी मध्यवस्तीतील महाविद्यालयांची मैदाने देण्यास नकार दिला होता. शहराच्या मध्यवस्तीत नदीपात्र वगळता एकही मोठे मैदान नाही. सुरक्षितता आणि वाहतूक कोंडीच्या कारणासाठी रस्ते व गर्दीच्या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देणार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही उमेदवारांनी सभांसाठी शाळा आणि महाविद्यालयाच्या मैदानासाठी बोलणी सुरू केली आहेत. सभांना परवानगी देण्यासाठी पोलिसांकडे ४८ तास अगोदर पत्र देणे बंधनकारक आहे. मात्र, ऐनवेळी परवानी मागितल्यास पोलिसांची धावपळ उडणार आहे. याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले की, पक्षांसोबत मैदाने आणि सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यासाठी फक्त चारच व्यक्ती हजर होत्या. त्यामुळे सर्व पक्षांना पुन्हा ४ तारखेला बैठकीस बोलाविण्यात आले आहे. अद्यापपर्यंत सभेसाठी परवानगी मागण्यात आलेली नाही.