News Flash

प्रचार साहित्याची मागणी दुपटीने वाढली!

प्रचार साहित्याला येणाऱ्या मागण्याही दुपटीने वाढल्या आहेत. ‘कोणताही झेंडा देऊ हाती’ असे म्हणत पुण्यातील प्रचार साहित्याच्या व्यावसायिकांनी या मागण्या पुरवण्यासाठी कंबर कसली आहे.

| October 2, 2014 03:30 am

महायुती तुटली, आघाडीही तुटली. यामुळे काही जण हळहळले. पण युती आणि आघाडीच्या एकामागून एक झालेल्या घटस्फोटांनंतर एक व्यवसाय मात्र खुशीत आला आहे. हा व्यवसाय आहे प्रचार साहित्याचा. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांसह मैदानात उतरल्यामुळे प्रचार साहित्य बनवणाऱ्या व्यावसायिकांकडे येणाऱ्या मागण्या दुप्पट झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
कार्यकर्त्यांच्या ध्यानीमनी नसताना घटस्थापनेच्या दिवशी प्रथम महायुती आणि नंतर आघाडी विभक्त झाली. राजकीय पक्षांची तडकाफडकी उमेदवार शोधण्याची धावपळ सुरू झाली. ज्या भागातून पूर्वी महायुतीचा एक आणि आघाडीचा एक असे दोन उमेदवार उभे राहत होते, त्यांची संख्या एका रात्रीत दुप्पट झाली आणि पंचरंगी लढतीची उत्कंठा निर्माण झाली. या परिस्थितीत प्रचार साहित्याला येणाऱ्या मागण्याही दुपटीने वाढल्या आहेत. ‘कोणताही झेंडा देऊ हाती’ असे म्हणत पुण्यातील प्रचार साहित्याच्या व्यावसायिकांनी या मागण्या पुरवण्यासाठी कंबर कसली आहे.
पुण्यातील व्यावसायिकांकडे राज्याच्या सर्वच भागातून मागण्या येत आहेत. मात्र निवडणुकीला दिवस फारच कमी उरल्याने या सर्व मागण्या पुरवणे शक्य होईल का, आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार साहित्याचा तुटवडा तर जाणवणार नाही ना, अशा विवंचनेत सध्या प्रचार साहित्याचे व्यावसायिक आहेत. ‘मुरुडकर झेंडेवाले’चे गिरीश मुरुडकर म्हणाले, ‘‘युती आणि आघाडी तुटल्यानंतर अनेक ठिकाणी उमेदवार ‘आयात’ करून उभे केले गेले. या उमेदवारांचा पूर्वीचा पक्ष आणि आताचा पक्ष वेगळा असल्याने नव्या पक्षाचे प्रचार साहित्य घेण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते धाव घेत आहेत. ‘उमेदवार दुप्पट म्हणजे धंदा दुप्पट’ हे समीकरण सरळ असले, तरी केवळ १५ दिवसांत या सर्व मागण्या पुरवणे व्यावसायिकांसाठी अवघड होणार आहे. सध्या आम्ही तयार माल पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या इतर भागातही पाठवत आहोत. काही उमेदवार प्रचार साहित्य एकदमच खरेदी करून न ठेवता लागेल तशी मागणी नोंदवतात. अशा स्थितीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार साहित्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही उमेदवाराला नाही म्हणावे लागू नये याची काळजी आम्ही घेत असून त्यासाठी कामगार जास्तीचे काम करत आहेत.’’
सध्या प्रचार फे ऱ्यांसाठीची उपरणी, टोप्या आणि झेंडय़ांना मागणी असल्याचेही मुरूडकर यांनी सांगितले. शर्टावर किंवा कुडत्यावर लावण्यासाठीचे रंगीत दिवे असलेले बॅजेस, दुचाकींना लावण्याचे पक्षाच्या चिन्हाचे ‘प्लॅकार्ड्स’ आणि खास उमेदवारांसाठी बनवली जाणारी ‘फॅन्सी’ उपरणीही लोकप्रिय असल्याचे ते म्हणाले.
पक्षाच्या ‘लोगो’च्या कटआउट्सना असलेली मागणी सध्या दुपटीने वाढली असल्याची माहिती ‘देडगांवकर क्रिएशन्स’चे स्वप्नील देडगांवकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘पक्षाच्या लोगोचे हाताला अडकवता येणारे कटआउट्स सध्या लोकप्रिय असून त्यांची मागणी ५० टक्क्य़ांनी वाढली आहे. पूर्वी युती किंवा आघाडीपैकी ज्यांचा उमेदवार असे त्यांचेच प्रचार साहित्याचे काम असे. आता सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचार साहित्य घेत आहेत. टेम्पो, जिप्सी किंवा रिक्षाला तिन्ही बाजूंनी पक्षाचे बॅनर्स लावून प्रचाराच्या या गाडय़ा सजवून देण्यालाही चांगली मागणी आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2014 3:30 am

Web Title: election campaign traders political party
Next Stories
1 एकही उमेदवार आयात केला नसल्याचा शिवसेनेचा दावा
2 युती-आघाडी फुटल्याचा फटका अन् बंडखोरीचीही भर
3 गुन्हा दाखल अन् तपासही सुरू!
Just Now!
X