दररोज फारशी चालण्याची सवय नसलेले ‘ते’ सगळे सध्या प्रचंड व्यायाम करत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची नुसती पायपीट सुरू आहे. विशेष म्हणजे दमवून टाकणारा हा व्यायाम ते बारीक होण्यासाठी किंवा आरोग्यासाठी नव्हे, तर चक्क मतांसाठी करत आहेत. ‘ते’ आहेत विधानसभा निवडणुकीचे उमेदवार!
प्रचार सुरू झाल्यापासून तो आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक उमेदवाराच्या दिनक्रमात पदयात्रांनाच सर्वाधिक महत्त्व दिलेले दिसत आहे. पदयात्रांच्या निमित्ताने घेतल्या जाणाऱ्या नागरिकांच्या गाठीभेटी उमेदवारांना महत्त्वाच्या वाटत आहेत. मात्र या पदयात्रांच्या निमित्ताने त्यांना प्रचंड पायपीट करावी लागत आहे. चालण्याची फारशी सवय नसलेल्या उमेदवारांना ही पायपीट दमवून टाकत आहे, तर आधीपासूनच चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांना त्या अनुभवाचा इथे उपयोग होताना दिसत आहे.
शिवाजीनगरमधील शिवसेनेचे उमेदवार मिलिंद एकबोटे म्हणाले, ‘‘दररोज दोन सत्रांमध्ये प्रत्येकी किमान ५ ते ७ किलोमीटर चालावे लागते. पण मतदाराला उमेदवार आणि उमेदवाराला मतदारांची प्रत्यक्ष ओळख करून घेण्यासाठी पदयात्रा हेच प्रभावी माध्यम आहे. मी नियमित व्यायाम करतो, गड-किल्ल्यांवरही नेहमीचे फिरणे असते. त्यामुळे चालण्याचा शीण फारसा जाणवत नाही. आपल्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे चालण्याची क्षमता दुणावते.’’
दररोज ४ ते ५ किमी चालण्याची सवय प्रचारात उपयोगी पडत असल्याचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी पूर्वीही रोज ४५ मिनिटे चालत होतो. पण आता पदयात्रांच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी १५ ते २० किलोमीटर चालावे लागते. प्रचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत मी सुमारे २०० किलोमीटर चाललो असेन. मतदारांची समोरासमोर ओळख करून घेण्यासाठी पदयात्रा महत्त्वाची आहे.’’