निवडणुकांचा प्रचार आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता उमेदवारांना दिवसाचे चोवीस तासही कमी पडायला लागले आहेत. भल्या पहाटे सुरू झालेला उमेदवारांचा दिवस रात्री २-३ वाजेपर्यंत मावळत नाही.
भल्या पहाटेच उमेदवारांचा दिवस सुरू होतो. अगदी सकाळी सकाळीच घराबाहेर कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते. आदल्याच दिवशी प्रचाराचे नियोजन झालेले असते. सकाळी फिरायला येणाऱ्या मतदारांना भेटण्याच्या निमित्ताने भल्या सकाळीच प्रचार सुरू होतो. मतदारसंघातील जॉगिंग ट्रॅक, टेकडी, देवळे अशा ठिकाणी प्रचारासाठी निघायचे असते. एका दिवशी अशी किमान चार ते पाच ठिकाणे निश्चित केलेली असतात. सकाळी ८ वाजण्यापूर्वीच हा प्रचार संपवून पुढच्या मोहिमेसाठी निघायचे असते.
हा प्रचार संपवून घरी किंवा कार्यालयात पोहोचेपर्यंत पुढच्या पदयात्रेची किंवा शोभायात्रेची तयारी सुरू झालेली असते. एरवी आपल्या नियोजनाप्रमाणे कार्यकर्त्यांना पळवणारी नेतेमंडळी सध्या मात्र आपल्या मतदाराच्या दैनंदिन वेळापत्रकाचा विचार करत आहेत. तरुण किंवा नोकरदार मतदार सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याला गाठण्यासाठी सकाळीच पदयात्रा किंवा शोभायात्रांचे नियोजन करावे लागते. एरवी मोठय़ा गाडय़ांमधून फिरणारे हे उमेदवार सध्या मात्र अगदी सकाळपासून दुपारी जेवणापर्यंत वेगवेगळ्या भागांत पायी फिरत आहेत. बहुतेकांचे दुपारचे जेवणही सध्या प्रचार कार्यालयात किंवा पक्ष कार्यालयातच होते आहे. मग कार्यकर्त्यांची बैठक, काही वेळा पक्षाची बैठक, एखादा मोठा नेता असेल तर त्यांनी घेतलेली बैठक या सगळ्यात दुपारही टळून जाते. त्याच वेळी कुणीतरी संध्याकाळच्या प्रचाराचे नियोजन हातात ठेवते.
या सगळ्यात पक्षाच्या एखाद्या नेत्याची शोभायात्रा किंवा सभा असेल तर त्याचीही भर पडते. आपल्या मतदारसंघातील सभा किंवा शोभायात्रा चांगली होण्यामागे उमेदवाराची प्रतिष्ठाच पणाला लागलेली असते. त्यामुळे सभांच्या तयारीकडे उमेदवारही जातीने लक्ष देत असतात. त्याचप्रमाणे पक्षाने आयोजित केलेल्या विविध संघटनांच्या, गटांच्या मेळाव्यानाही हजेरी लावावी लागते. दिवसभराची जाहीर प्रचाराची रणधुमाळी अगदी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते. मात्र, त्यानंतरही उमेदवारांचा दिवस संपलेलाच नसतो. रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका, दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराचे नियोजन, इतर उमेदवारांनी काय केले त्याचा आढावा घेतला जातो.
शेवटच्या टप्प्यात मोठय़ा नेत्यांच्या सभा, शोभायात्रांनी जोर धरला आहे. त्याचप्रमाणे अनेक उमेदवारांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. दिवसभर मतांचे हिशोब, त्यानुसार कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करायचे याचा आढावा यानेच मतदारांचा दिवस भरून गेला आहे. अनेकांना त्यांच्या प्रचारात कुटुंबीयांनीही साथ दिली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या बरोबरीने कुटुंबीयांचा दिवसही प्रचारापासून प्रचारापर्यंत असाच झाला आहे.
‘‘पहाटे पाच वाजल्यापासूनच दिवस सुरू होतो. मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर भर असल्यामुळे दिवसाचा जास्तीत जास्त वेळ हा पदयात्रा आणि प्रचार फे ऱ्यांमध्ये जातो. त्यामुळे दिवसाचा वेळ कमी पडू लागला आहे.’’
– अभय छाजेड, काँग्रेस उमेदवार