घराजवळचे केंद्र लवकरच समजणार; टक्केवारी वाढविण्यावर भर

विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार यंदा प्रथमच मतदान केंद्रे ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना घराजवळचे मतदान केंद्र लगेच समजणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काही मतदारांच्या मतदान केंद्रे घरापासून लांब गेली असल्याच्या तक्रारी येत आहेत. या मतदारांनाही या सुविधेचा फायदा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पुण्यात मतदानाचा टक्का कमी राहिला होता. या पाश्र्वभूमीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार ३० टक्क्य़ांपेक्षा कमी मतदान झालेली मतदानकेंद्रं शोधण्यात आली आहेत. या ठिकाणांवर अधिक लक्ष देऊन विधानसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पुण्यातील मतदानाचा टक्का खालावल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने अभ्यास करून मतदान वाढवण्यासाठी नियोजन केले आहे. मतदान चिठ्ठय़ांचे वाटप करण्याबरोबरच बदललेल्या मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काही मतदारांची मतदान केंद्रे घरापासून लांब गेली असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, ही केंद्रे दोन कि.मी.पेक्षा लांब अंतरावर असणार नाहीत, याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतरही दोन कि.मी.पेक्षा लांब अंतरावर केंद्र असल्यास संबंधित ठिकाणी मतदारांची संख्या लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपातील केंद्रे उपलब्ध करून दिली जातील. याशिवाय सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याचे प्रयत्न केले जातील. ज्या ठिकाणी उद्वाहकाची व्यवस्था आहे, अशी २५० केंद्रे पहिल्या मजल्यावर असतील, असेही राम म्हणाले.

गुगल टॅगिंग म्हणजे काय?

मोबाइलमधील गुगलमॅपवर गेल्यानंतर आपण जिथे आहोत, तेथून जवळ  असलेल्या बँकांची एटीएम, हॉटेल, रुग्णालये, शाळा इत्यादी माहिती समजते. याबरोबरच आता मतदान केंद्रही समजणार आहे. मतदार याद्यांमधील विधानसभानिहाय मतदारसंघाची मतदान केंद्रे गुगल टॅग करण्यात येणार असल्याने यंदा मतदारांना मतदान केंद्रांची माहिती मिळेल.