ऑक्टोबरमधील मतदार नोंदणीची नोव्हेंबरमध्ये जाहिरात

आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेतील जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ पुढे आला आहे. नाव नोंदणीचे आवाहन मतदारांना करताना ऑक्टोबरमधील मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाची जाहिरात एक नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये मतदार नोंदणीसाठी चक्क ऑक्टोबर महिन्यातील काही दिनांक देण्यात आले आहेत. कोणतीही दक्षता न घेता जाहिरात प्रसिद्ध केल्यामुळे जिल्हा प्रशासनाची ही ‘करामत’ चर्चेचा विषय ठरली आहे.

मतदार यादीत नाव नोंदविणे, नावातील दुरुस्ती, मृत मतदारांची नावे यादीतून वगळणे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाला तीन ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ही मोहीम शुक्रवारी (तीन नोव्हेंबर) संपणार आहे. या मोहिमेत नेहमीच्या पद्धतीने अर्ज करून नावनोंदणी करता येत असून ऑनलाईन पद्धतीची सुविधाही जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या योजनेची मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठय़ा प्रमाणावर जाहिराती करणे सुरु आहे. त्याअंतर्गत शहर आणि जिल्ह्य़ात काही ठिकाणी होर्डिग्जही उभारण्यात आली असून विविध माध्यमातून जनहितासाठी जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नोंदणी करण्याचे आवाहन करण्यासाठी निवडणूक आयोगाची जाहिरात जिल्हा निवडणूक शाखेकडून एक नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ‘सुट्टी मिळत नाही, खूप कामे बाकी आहेत, आज नाही उद्या करूयात, खूप वेळ लागेल,’ अशी कोणतीही कारणे किंवा सबबी सांगू नका, नावनोंदणी करा, असे या जाहिरातीमधून आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही कारणे सांगण्याऐवजी आठ आणि बावीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. एक नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील शिबिरांच्या दिनांकांच्या करामतीवरून मतदारांमध्ये मात्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.