News Flash

निवडणूक साहित्याची आयोगाकडून दरनिश्चिती

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून विविध वस्तूंच्या दरांची सूची निश्चित केली जाते.

चहा-कॉफी ६ रुपयांना, वडापाव १२ तर शाकाहारी जेवण ६० रुपयांना

निवडणुकीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाची तसेच तीनशे वस्तूंची दरसूची निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. या वस्तूंचे दरही निश्चित करण्यात आले असून खाद्यपदार्थाबरोबरच सर्व प्रकारच्या प्रचार साहित्याचा या दरसूचीत समावेश आहे. चहा-कॉफीसाठी सहा रुपये, वडापावसाठी बारा रुपये, शाकाराही जेवणासाठी साठ तर मांसाहारी जेवणासाठी एकशे वीस रुपये असा दर आयोगाने निश्चित केला आहे. आयोगाने निश्चित केलेल्या या दरानुसारच उमेदवारांना निवडणुकीनंतरचा खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून विविध वस्तूंच्या दरांची सूची निश्चित केली जाते. पालिकेच्या निवडणुकीसाठीही खुल्या बाजारातून दर मागविण्यात आले होते. त्यानुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत. ही दरसूची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे. फर्निचर, मंडप व्यवस्थेच्या सदोतीस वस्तू, चहापान, भोजनासंबंधी चौदा बाबी, होर्डिग्ज-बॅनर्स, झेंडे, टोप्यांचे बारा प्रकार, प्रचार कालावधीत वापरण्यात येणारी वाहने, प्रचारसाहित्य छपाईचे प्रकार, वृत्तपत्र आणि दृकश्राव्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जेवणावळीवर मोठा खर्च होतो. त्यामुळे बारा प्रकारचे खाद्यपदार्थ गृहीत धरले आहेत. वडापाव, चहा-कॉफी, शाकाहारी-मांसाहारी जेवण, बाटलीबंद पिण्याचे पाणी, खिचडी, पोहे, उपीट आदींचा त्यात समावेश आहे. वडापाव बारा रुपये, पुरीभाजी तीस रुपये, शाकाहारी जेवणासाठी साठ, तर मांसाहारी जेवणासाठी एकशेवीस रुपये असा हा दर आहे. न्याहारीच्या पदार्थाचा दरही ताटलीनुसार ठेवण्यात आला आहे.

फर्निचर, खुच्र्या, झेंडे, कापडी झेंडे, फ्लेक्स, बॅनर्स या प्रचारसाहित्यांचेही दर ठरविण्यात आले आहेत. गांधी टोपीसाठी पाच रुपये, छापील टोपीसाठी दहा रुपये, कापडी झेंडय़ासाठी प्रतिनग एकशे दोन रुपये, डिजिटल फ्लेक्स, बॅनर्ससाठी प्रतिचौरस मीटर बारा रुपये तर कापडी बॅनर्ससाठी प्रतिचौरस मीटर अकरा रुपये वीस पैसे असा दर आहे. पुणेरी पगडीसाठीचा दर एकशे बावन्न रुपये असा निश्चित केला आहे. प्रचाराच्या कालावधीत उमेदवाराने स्वत:कडील वाहन वापरल्यास दहा रुपये प्रतिकिलोमीटर अधिक इंधन खर्च आठ रुपये असा दर धरला जाईल. साधी बस, आराम बससाठी तीन हजार ते साडेतीन हजार रुपये मोजावे असा दर निश्चित करण्यात आला असून जीप, कार या लहान प्रकारातील वाहनांसाठीचा दर दोन हजार रुपये असा आहे. सायकल, रिक्षासाठी अनुक्रमे प्रतिदिन तीनशे आणि सातशे रुपयांचा दर ठरविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 3:10 am

Web Title: election commission of material
Next Stories
1 इंजिन आले पळा पळा..
2 पिंपरीत ‘करो मतदान’चा संदेश १२ लाख मतदारांपर्यंत
3 पिंपरीत आजी-माजी नगरसेवकांचा भाजपकडे ओघ कायम
Just Now!
X